वादग्रस्त डेकाटे पुन्हा नाशिकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:21 AM2018-06-02T01:21:05+5:302018-06-02T01:21:05+5:30
जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांची शुक्रवारी (दि.१) बदली झाली असून, त्यांच्या जागी नाशिक महापालिकेत अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे विशेष ठरावाने हकालपट्टी करण्यात आलेले डॉ. विजय डेकाटे यांची जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. बदली होताच डॉ. डेकाटे पदभार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेत दाखल झाले.
नाशिक : जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांची शुक्रवारी (दि.१) बदली झाली असून, त्यांच्या जागी नाशिक महापालिकेत अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे विशेष ठरावाने हकालपट्टी करण्यात आलेले डॉ. विजय डेकाटे यांची जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. बदली होताच डॉ. डेकाटे पदभार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेत दाखल झाले. परंतु, त्यांना पदभार सोपवला नसलाची माहिती सूत्रांनी दिली असून, डेकाटेंची यापूर्वीची वादग्रस्त कारकिर्द पाहता त्यांना रुजू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागण्याचे संकेत आहेत. जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांची नाशिक जिल्हा परिषदेत चार वर्षे सेवा झाल्याने ते बदलीस पात्र असून, त्यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. राज्यातील सुमारे २२ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निर्गमित झाले असून, या आदेशात डॉ. वाघचौरे यांची भंडारा जिल्हा परिषद आरोग्य अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर गेल्यावर्षी नाशिक महापालिकेतून बदली करण्यात आलेले डॉ. विजय डेकाटे यांची नाशिक जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वीही डॉ. डेकाटे यांची जिल्हा आरोग्य अधिकारीपदी बदली झाली होती. परंतु, विविध कारणांनी वादग्रस्त असलेले डॉ. डेकाटे यांची कारकिर्द लक्षात घेऊन त्यांना जिल्हा परिषद पदाधिकाºयांकडून विरोध झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी त्यांना रुजू करून घेतले नव्हते. असे असताना, यावेळीही शासनाकडून नियमित बदली प्रक्रियेतून नाशिक जिल्हा परिषदेत रुजू होण्यासाठी आलेल्या डेकाटे अद्याप पदभार सोपविण्यात आलेला नाही. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
डेकाटे यांची महापालिकेतील कारकीर्द
नाशिक महापालिकेत डॉ. विजय डेकाटे यांची कारकीर्द सिंहस्थ साहित्य खरेदी, सफाई कामगारांविषयीचे धोरण, घंटागाडी ठेकेदारांशी असलेल्या संबंधांमुळे वादग्रस्त राहिलेली आहे. त्यामुळे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी डेकाटेंची विभागीय चौकशी करून डेकाटेंची उचलबांगडी करीत वैद्यकीय अधीक्षकपदाचा प्रभारी कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या कार्यकाळातही वैद्यकीय अधिकारी कर्मचाºयांच्या गैरहजेरीमुळे महिलेची प्रसूती रिक्षात झाल्याचा प्रकार घडल्याने तत्कालीन आयुक्तांनी डेकाटे यांना मनपा सेवेतून कार्यमुक्त केले होते.