नाशिकमध्ये वनजमिनिवर उभारलेल्या २०० कोटींच्या वादग्रस्त सौर प्रकल्पाला वनखात्याने ठोकले कुलुप!

By अझहर शेख | Published: March 28, 2023 02:25 PM2023-03-28T14:25:01+5:302023-03-28T14:25:37+5:30

वनविभागाची धाडसी कारवाईने उडाली खळबळ

controversial solar project of 200 crores built on forest land in nashik has been blocked by forest department | नाशिकमध्ये वनजमिनिवर उभारलेल्या २०० कोटींच्या वादग्रस्त सौर प्रकल्पाला वनखात्याने ठोकले कुलुप!

नाशिकमध्ये वनजमिनिवर उभारलेल्या २०० कोटींच्या वादग्रस्त सौर प्रकल्पाला वनखात्याने ठोकले कुलुप!

googlenewsNext

नाशिक: नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी-पांझण शिवारातील वनजमिनीवरील टी.पी. सौर ऊर्जा कंपनीच्या प्रकल्पाचे अतिक्रमण मागील दोन महिन्यांपासून गाजत आहे. नाशिकचे विभागीय वनाधिकारी यांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी वनाधिकारी व १५० वनकर्मचाऱ्यांसह २००पेक्षा पोलिसांचा फौजफाटा घेत डॉक्टरवाडी-पांझण शिवारात धडक दिली. येथील सुमारे २०० कोटी रुपयांचा सौर ऊर्जा प्रकल्पाला वनविभागाने ‘कुलुप’ ठोकले. वनजमिनीवर अतिक्रमण करत व्यावसायिक वापर करणाऱ्या खासगी कंपनीला पहिल्यांदाच वनविभागाने अशाप्रकारे ‘दणका’ दिल्याने राज्यात नाशिकमधील ही कारवाई चर्चेत आली आहे.

नांदगाव वनपरिक्षेत्रातील डॉक्टरवाडी-पांझण शिवारात असलेल्या वनजमिनीवर टी.पी.सौर्या या कंपनीने साैर ऊर्जानिर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. पांझणला वणी दक्षता पथकाने दोन दिवसांपुर्वी छापा टाकून वन कक्ष क्रमांक४८९मधील वनजमिनीवर अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच जेसीबी, ट्रॅक्टरदेखील जप्त केले होते. तरीदेखील याठिकाणी प्रकल्प उभारणीचे काम सुरूच असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांनी संपुर्ण प्रकल्प सील करण्याचे आदेश विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांना दिले. माळी यांनी याप्रकरणी नियोजन करत मंगळवारी सकाळी नांदगाव, चांदवड, येवला वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी कर्मचाऱ्यांसह नाशिक, वणी, अहमदनगरचे वन फिरते पथकांची (दक्षता पथक) अतिरिक्त कुमक व १५०ग्रामिण पोलिसांचा फौजफाटा घेऊन सकाळी दहा वाजता धडक दिली. यावेळी तातडीने सर्व प्रकल्प जप्त करण्याची कारवाईला सुरूवात केली आहे. यमुळे वनविभागासह नाशिक महसुल खात्यातदेखील खळबळ उडाली आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाचा विस्तार मोठा असल्यामुळे आज दिवसभर कारवाई सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वनविभागाकडून शासनाला अहवाल सादर

याबाबत पुर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार करुन तातडीने वनजमिन विक्रीप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. राखीव वनावर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा ठपका वनखात्याने ठेवत वनमंत्रालयाकडे सविस्तर अहवाल पाठविला आहे. यानंतर महसुल आणि वनविभाग आमने-सामने आले होते. विधीमंडळात उपस्थित झालेल्या लक्षवेधीबाबत शासनाला सविस्तर उत्तर नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांनी पाठविलेले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: controversial solar project of 200 crores built on forest land in nashik has been blocked by forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक