कथित पोलीस मित्रांमुळे सुन्यासुन्या चौकांत होताहेत वादविवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 02:34 PM2020-03-28T14:34:49+5:302020-03-28T14:40:55+5:30
डॉक्टर, परिचारिका, भाजीपाला विक्रेते, केमिस्ट, पत्रकार, दूधविक्रेते यांसारख्या घटकांनाही कथित पोलिस मित्रांच्या अतिउत्साह अन् रोष अंगावर ओढावून घ्यावा लागत आहे.
नाशिक : ‘चहापेक्षा किटली गरम’ या उक्तीप्रमाणे ‘पोलिस मित्र’ सध्या शहरातील विविध चौकांमध्ये वावरताना दिसत आहेत. त्यांचा अतिउत्साह निरव शांततेत वादाला तोंड देणारा ठरू लागला आहे. पोलीस मित्रांमुळे बंदोबस्ताचा ताण काहीसा हलका होईल, असे अस्सल पोलिसांना वाटत होते, मात्र त्यांची डोकेदुखीच अधिक वाढल्याचे चित्र शहरातील सुन्या-सुन्या चौकांमध्ये दिसत आहेत.
शहर व परिसरात कुठल्याहीप्रकारची कायदासुव्यवस्था धोक्यात आलेली नाही. संचारबंदी केवळ मानवी आरोग्याच्या सुरक्षेसाठी लावण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीत रहावी, यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अत्यावश्यक सेवेत समाविष्ट होणारे डॉक्टर, परिचारिका, भाजीपाला विक्रेते, केमिस्ट, पत्रकार, दूधविक्रेते यांसारख्या घटकांनाही कथित पोलिस मित्रांच्या अतिउत्साह अन् रोष अंगावर ओढावून घ्यावा लागत आहे. बंदोबस्तावरील पोलिसांच्या हाती काठी नसेल मात्र या कथित स्वयंसेवकांच्या हातात काठी दिसते. दुचाकीस्वारांच्या अंगावर हे कथित स्वयंसेवक थेट धावून जात त्यांना जाब विचारत आहेत. कोरोनामुळे नागरिकांनी घरात थांबावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. नागरिकांकडूनदेखील या आवाहनाला साद घातली जात आहे; मात्र काही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांना दुचाकीचा वापर करण्याशिवाय दुसरा गत्यंतर नाही; मात्र ही बाब कथित स्वयंसेवकांच्या लक्षात येत नाही, किंबहुना काही नाकाबंदी पॉइंटवर तर हे कथित पोलीस मित्र तेथील बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बंदोबस्ताचा ताण अन् या पोलीस मित्रांच्या वादामुळे वाढणारी डोकेदुखी असा दुहेरी त्रास अस्सल पोलिसांना होत आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.
कारवाईला माणुसकीचा चेहरा; मात्र....
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत अद्यापही नागरिकांवर कारवाई करताना माणुसकीचा चेहरा दिसत आहे. कारवाईदरम्यान, कुठल्याहीप्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घेतली जात आहे; मात्र ‘पोलीस मित्र’ म्हणून ज्यांना मदतीला पोलिसांनी घेतले आहे, त्या मंडळींमुळे पोलीस कारवाईचा माणुसकीचा चेहरा मलीन होताना दिसत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकादेखील मोठ्या संख्येने घरातच थांबले आहेत; काहींचा अपवाद वगळता जे लोक वाहनांनी बाहेर पडत आहेत, ते केवळ अत्यावश्यक सेवेतील घटक आहेत, मात्र याकडे कथिक पोलीस मित्र दुर्लक्ष करत आपला ‘रुबाब’ गाजवित आहेत.