वाया जाणाऱ्या पाण्याची पशु-पक्ष्यांसाठी सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 05:34 PM2019-06-05T17:34:10+5:302019-06-05T17:37:29+5:30
माणुसकीचा झरा : औंदाणे ग्रामपंचायत सदस्याचा पुढाकार
औंदाणे : दुष्काळी स्थितीमुळे पाण्याच्या एकेक थेंबाचे महत्व वाढू लागले आहे. त्यामुळे एकेका थेंबाची ही लढाई सर्वत्र सुरू असतानाच बागलाण तालुक्यातील यशवंतनगर, औंदाणे येथील ग्रामपंचायत सदस्य शर्मिला गोसावी यांनी पुढाकार घेत नळाद्वारे वाया जाणारे पाणी साठविण्यासाठी हौद तयार करत जनावरांसह पक्ष्यांना पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची धग जाणवू लागली आहे. त्याचा फटका पशु-पक्ष्यांनाही बसू लागला आहे. यशवंतनगर औंदाणे येथे ग्रामस्थांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणी भरताना बरेचसे पाणी वायाही जाते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य शर्मिला गोसावी यांनी नळाच्या आजूबाजूला हौद तयार करून वाया जाणारे पाणी अडवले आहे. त्यामुळे परिसरातील शेळ्या-मेंढ्या, जनावरांसह पक्ष्यांचीही पाण्याची सोय होऊ शकली आहे. गोसावी यांना या कामी सरपंच सविता निकम यांचेसह सर्व सदस्य गणेश निकम, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गोसावी यांनी सहकार्य केले. परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने वन्य प्राणीही गावाकडे पाण्यासाठी धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
मनाला समाधान
गावात नळाद्वारे वाया जाणारे पाणी अडवून हौद बांधण्यात आला. त्यामुळे शेळ्या-मेंढ्या यांच्यासह पक्ष्यांची पाण्याची सोय होऊ शकली आहे. ते पाहून मनाला समाधान वाटते. प्रत्येक नागरिकाने आपल्या गावात घरासमोर, गच्चीवर अथवा शेतात पाण्याची सोय केली तर नक्कीच पशु-पक्ष्यांचेही संरक्षण होईल.
- शर्मिला गोसावी, यशवंनगर, ग्रामपंचायत सदस्या