कोरोना प्रमाण कमी झाल्यानंतरच्या २० दिवसात संमेलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:04+5:302021-03-08T04:15:04+5:30
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नाशिकचे साहित्य संमेलन स्थगित झाले असले तरी संमेलन नक्की होणार आहे. त्यामुळे ज्या क्षणी ...
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नाशिकचे साहित्य संमेलन स्थगित झाले असले तरी संमेलन नक्की होणार आहे. त्यामुळे ज्या क्षणी कोरोनाचे प्रमाण कमी होईल, त्यानंतरच्या २० दिवसात संमेलन भरवण्यासाठी सज्जता राहणार असल्याचे नाशिकच्या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मार्च महिन्याअखेरीस संमेलनाचे आयोजन कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शक्य होणार नाही, हे लक्षात आल्यानेच संमेलन स्थगित करण्यात आले आहे. यापुढे दर १५ दिवसांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर संमेलनाची तारीख निश्चित करुन पुढच्या तयारीला लागणार असल्याचेही टकले यांनी नमूद केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल संमेलन घ्यावे, असेही काही प्रस्ताव आले होते. मात्र, प्रत्यक्ष संमेलन जसे सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहाेचते, तसे व्हर्च्युअलला शक्यता नाही. त्यामुळे नाशिकला साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठीची सर्व सज्जता असून केवळ परिस्थिती अनुकूल झाली की त्यानंतरच्या २० दिवसात संमेलन भरवले जाईल, असेही टकले यांनी नमूद केले. या साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत सुमारे तीन ते चार लाख रुपयांचा निधी खर्च झाला असला तरी तो या प्रक्रियेचा भाग असल्याचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले. तसेच आता निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याने ती पूर्ण करुन घेण्यात येणार असल्याचेही जातेगावकर यांनी नमूद केले. दरम्यान महामंडळाने संमेलनासाठी मेपर्यंत मुदत दिल्याने संमेलन मे महिन्याच्या अखेरपर्यंत होण्याची चर्चा आहे.
इन्फो
निधी पुढील आर्थिक वर्षात
साहित्य संमेलनासाठीचा प्राप्त झालेल्या शासनाचा ५० लाखांचा निधी पुढील वर्षात दाखवण्याची तरतूद करावी लागणार आहे. तसेच अन्य आमदार आणि मनपा, जिपकडूनदेखील मिळणारा निधी पुढील आर्थिक वर्षातच वळवण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतील. यंदा सरकारने साहित्य संमेलनासाठी प्रति आमदार ५ लाखांचाच निधी देण्यास मंजुरी दिली होती. मात्र, पुढील आर्थिक वर्षी आमदार निधी २ कोटींवरुन ३ कोटींवर जाणार असल्याने त्यातही वाढ करुन मिळू शकेल, असेही टकले यांनी नमूद केले.