७५ लाखांच्या निधीसाठी मागील कामांवर संक्रांत
By admin | Published: July 9, 2017 12:59 AM2017-07-09T00:59:27+5:302017-07-09T00:59:47+5:30
नाशिक : भाजपाने मागील पंचवार्षिक काळातील प्रशासकीय मान्यता न झालेली तसेच निविदा न निघालेली कामे वगळण्याची तयारी चालविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : चालू आर्थिक वर्षात नगरसेवकांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा निधी मिळण्यासाठी सत्ताधारी भाजपाने मागील पंचवार्षिक काळातील प्रशासकीय मान्यता न झालेली तसेच निविदा न निघालेली कामे वगळण्याची तयारी चालविली आहे. भाजपाच्या या प्रयत्नांना मागील पंचवार्षिक काळातील सत्ताधारी मनसेने जोरदार आक्षेप घेतला आहे. भाजपाकडून लोकहिताविरोधीच निर्णय घेतला जात असल्याची भावना मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी व्यक्त केली आहे
महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे २१७६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महासभेने मंजूर केले असून त्याबाबतचा ठराव नुकताच प्रशासनाला प्राप्त झाला आहे. सदर अंदाजपत्रकात महापौर रंजना भानसी यांनी महासभेत घोषणा केल्यानुसार ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, महापालिकेची एकूणच आर्थिक स्थिती लक्षात घेता आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी प्रत्येकी ४० लाख रुपयेच निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचा मुखभंग झाला होता. मात्र, महापौर रंजना भानसी या ७५ लाख रुपये निधी देण्यावर ठाम राहिल्या. दरम्यान, शुक्रवारी (दि.७) महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, भाजपा गटनेता यांनी एकत्रित जाऊन आयुक्तांची भेट घेतली व ७५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्याची मागणी केली. यावेळी, आयुक्तांनी मागील काळातील प्रशासकीय मान्यता न झालेली तसेच निविदा प्रक्रियेत नसलेली कामे वगळून स्पील ओव्हर कमी करण्याची सूचना केली. त्यानंतरच ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देता येऊ शकेल, अशी भूमिका घेतली. त्यानुसार, सत्ताधारी भाजपाने मागील पंचवार्षिक काळातील सुमारे २०० कोटी रुपयांची प्रस्तावित कामे वगळण्याची तयारी चालविली आहे. या प्रयत्नांना मागील पंचवार्षिक काळातील सत्ताधारी मनसेने हरकत घेतली आहे. मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले, मागील पंचवार्षिक काळात लोकहिताचीच कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. त्याबाबत अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आलेली आहे.