आभासी तंत्रज्ञानाद्वारे रंगला मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:25 AM2021-03-04T04:25:44+5:302021-03-04T04:25:44+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुक्त विद्यापीठातर्फे २६ वा दीक्षांत सोहळा मिक्स रिॲलिटी तंत्राच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने साजरा करीत शिक्षण क्षेत्रात ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुक्त विद्यापीठातर्फे २६ वा दीक्षांत सोहळा मिक्स रिॲलिटी तंत्राच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने साजरा करीत शिक्षण क्षेत्रात मंगळवारी (दि. २) एक नवा अध्याय रचण्यात आला आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या दीक्षांत सोहळ्यास व्यासपीठावर कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे, विविध विद्याशाखांचे संचालक डॉ. नागार्जुन वाडेकर, प्रा. पंडित पलांडे, डॉ. कविता साळुंके, डॉ. सुनंदा मोरे, डॉ. प्रमोद खंदारे, प्रा. जयदीप निकम, डॉ. मधुकर शेवाळे, डॉ. प्रवीण घोडेस्वार आदी उपस्थित होते.
शेकडो किलोमीटर दूर असलेल्या या विद्यार्थ्यांची वास्तव-आभासी तंत्रज्ञानाद्वारे सोहळ्यास दिसलेली उपस्थिती राज्यपाल कोश्यारी यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधणारी ठरली. मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात २०१९ व २०२० या दोन वर्षांत विविध विद्याशाखेतील स्नातकांना पदविका, पदव्युत्तर पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल, पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली असून तब्बल २ लाख ९३ हजार ८५२ विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त झाली आहे. यात ४२ हजार ६१२ पदविकाधारक, ११४ पदव्युत्तर पदविकाधारक, २ लाख १५ हजार २६९ पदवीधारक, ३५ हजार ८४९ पदव्युत्तर पदवीधारकांचा समावेश आहे, तर ५२ स्नातकांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.
इन्फो-
यशस्वी ऑनलाइन परीक्षेचे आयोजन
विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी लॉकडाऊन कालावधीत विद्यापीठाने अभ्यास केंद्रांच्या सहकार्याने
ऑनलाइन पद्धतीने ८ हजारांहून अधिक संपर्कसत्र घेतले. तसेच परीक्षा घेणेही शक्य नसल्याने युजीसीसह महाराष्ट्र शासनाच्या सूचनांनुसार विद्यापीठाने तब्बल १ लाख ९१ हजार १२९ विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा यशस्वीरीत्या घेतल्याचे कुलगुरू ई. वायुनंदन यांनी सांगितले.
इन्फो-
ऑनलाइन शिक्षणाचा आदर्श वस्तुपाठ
कोविडच्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण कसे पोहोचवावे, याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने घालून दिला असून भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने सुरू असलेल्या देशव्यापी प्रयत्नांमध्ये विद्यापीठाचे योगदान मोठे आहे. ज्ञानगंगेचा हा निर्माण झालेला प्रवाह चिरंतन प्रवाहीतच राहील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला.