दीक्षांत समारंभ : मालेगावचा यशवंत बोरसे, साताऱ्याची एकता पवार सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी
By admin | Published: February 11, 2015 11:43 PM2015-02-11T23:43:56+5:302015-02-11T23:44:14+5:30
पोलीस अकादमीला स्वायत्तता : फडणवीस
नाशिक : विस्तार व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र पोलीस अकादमीला स्वायत्तता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे़ अकादमीत नवीन निवासस्थाने, क्लासरूम, खुले सभागृहाबरोबरच इतर सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या १११व्या तुकडीच्या दीक्षात संचलनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी मालेगावचा यशवंत बोरसे व साताऱ्याची एकता पवार यांच्यासह पुरस्कारप्राप्त प्रशिक्षणार्थींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला़
फडणवीस पुढे म्हणाले की, दहशतवाद, सायबर गुन्हेगारी, आर्थिक गुन्हे अशी नवी आव्हाने पोलीस दलासमोर आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सेवेतील पोलीस अधिकाऱ्यांना ई-प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ई-प्रशिक्षण, वरणगाव येथे पोलीस ट्रेनिंग स्कूल, पोलिसांना पदोन्नती ऐवजी 30 टक्के इन्सेंटीव्ह देण्यात येणार आहे़ १११व्या तुकडीतील ५४२ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांमध्ये १३२ महिलांचा समावेश आहे. या महिला अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाला शक्ती आणि मानवतेचा चेहरा प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्या कामगिरीने आणि वर्तनाने जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा. जनतेचे रक्षक म्हणून समाजात वावरताना पीडिताना आणि वंचितांना न्याय देण्याचे कार्य करावे. सेवाभावनेतून कार्य करताना मानवतेच्या भावनेने समाजाकडे पहावे आणि सतत कर्तव्यदक्ष रहावे. दहशतवादी नवे तंत्र घेऊन आव्हाने उभे करीत असल्याने पोलिसांना त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़
गृहराज्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस अकादमीने २२ हजारांहून अधिक सक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस दलाला दिले आहेत. सरकारनेही पोलिसांचे निवासस्थान, फॉरेन्सिक युनिट लॅब आदिंबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले असून, पोलीस दलाचे आधुनिकीकरणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत़ अकादमीचे संचालक नवल बजाज यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी व्यावसायिक वृत्ती अंगी बाळगीत प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जावे, असे आवाहन केले.
या दीक्षांत समारंभाची सुरुवात १११व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या शानदार संचलनाने झाली. संचलनाचे नेतृत्व नीलेश दाबेराव आणि मंगला खाडे यांनी केले. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल, अपर पोलीस महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम आदिंसह पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचे आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)