थंडीबरोबरच निवडणुकीच्या गप्पांना रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 05:34 PM2020-12-27T17:34:41+5:302020-12-27T17:35:15+5:30

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सुरुवातीच्या पहिले दोन दिवस तालुक्यातून फक्त दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. सध्या गावागावांत निवडणुकीच्या चर्चा रंगत असून, उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांना मात्र चांगलीच कसरत करावी लागत आहे. दरम्यान, शेवटच्या तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करताना, मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

Cooling the election gossip with the cold | थंडीबरोबरच निवडणुकीच्या गप्पांना रंगत

थंडीबरोबरच निवडणुकीच्या गप्पांना रंगत

Next

तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या विविध संस्थांच्या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यातील स्थानिक निवडणुका पक्षीय पातळीपेक्षा गटातटावर लढवल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि. २३ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी २ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत, तसेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीतच तीन दिवस सलग सुट्ट्या आल्याने उमेदवार व पॅनलप्रमुख ऑनलाइन अर्ज भरण्यात गुंतले होते. कागदपत्रे जमा करण्यात उमेदवारांचा वेळ जात आहे, तसेच प्रत्येक पॅनल प्रमुखांजवळ इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. कोणाला कोणत्या वॉर्डात उभे करावे, याची चाचपणी करण्यात येत आहे. दि. १ जानेवारी, १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांना मात्र सातवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेकांची अडचण निर्माण झाली आहे, तसेच सरपंचाचे आरक्षणही शासनाने रद्द केल्यामुळे उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांची चांगलीच दमछाक होत आहे. गावातील चावडी, चौकाचौकांत, सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीच्या गप्पांना चांगलेच उधाण आले आहे. प्रत्येक गावांत दोन-तीन पॅनल होत आहेत, तर काही उमेदवारांनी अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांचा चांगलाच कस लागत आहे. इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला जात आहे. तुमची साथ असेल, तर आम्ही उमेदवारी अर्ज भरतो, असे मतदारांजवळ सांगितले जात आहे. मतदार मात्र सर्वांनाच ह्यहोह्ण म्हणून वेळ निभावून नेत आहेत.
कोरोनाच्या भीतीचा ग्रामीण भागात विसर पडलेला असून, कोणीही सामाजिक नियमांचे पालन करीत नाहीत. सामाजिक अंतर पाळले जात नाही, मास्कचा वापर होत नाही, कोरोना ग्रामीण भागात हद्दपार झाला की काय, या आविर्भावात इच्छुक उमेदवारासह नागरिक वावरत आहेत. पॅनलप्रमुखांकडून मात्र अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. प्रत्येक पॅनलप्रमुखांजवळ इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. दिवसा वीज व इंटरनेटच्या अडथळ्यांमुळे उमेदवार आपले ऑनलाइन नामनिर्देशनपत्र रात्रीच्या वेळी भरत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये नेटवर्कचा खोडा निर्माण होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीनच दिवस उरले असून, सोमवारपासून तहसील कार्यालयात चांगलीच गर्दी राहणार आहे.

Web Title: Cooling the election gossip with the cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.