थंडीची चाहूल लागताच रब्बीच्या पेरण्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:52 AM2019-11-22T00:52:03+5:302019-11-22T00:59:33+5:30
खमताणे : कळवण तालुक्यात थंडीची चाहूल लागताच खमताणे परिसरात रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची आवारासावर करून गहू, हरभरा पेरणीला अनेक ठिकाणी प्रारंभ झाला आहे. विहिरींना मुबलक पाणी असल्याने यावर्षी तालुक्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खमताणे : कळवण तालुक्यात थंडीची चाहूल लागताच खमताणे परिसरात रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची आवारासावर करून गहू, हरभरा पेरणीला अनेक ठिकाणी प्रारंभ झाला आहे. विहिरींना मुबलक पाणी असल्याने यावर्षी तालुक्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा याबरोबरच उन्हाळ कांद्याची लागवड करण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन आहे.
जोरदार पावसामुळे यावर्षी खरिपाचे पीकही जोमात होते. उत्पन्न दृष्टिक्षेपात आल्यानंतर अतिवृष्टीमुळे शेतातच मका, बाजरी, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीने हतबल झालेला बळीराजा आले ते उत्पन्न पदरात पाडून घेत रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. ज्यांचे शेत तयार झाले त्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. बहुसंख्य शेतकरी पेरणीसाठी शेत तयार करीत आहेत.
जानेवारीत उळे तयार झाल्यानंतर उन्हाळ कांद्याची लागवड सुरू होईल. ज्यांच्याकडे उळे शिल्लक आहे, असे शेतकरी कांदा लागवडीला सुरुवात करतील. अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले. खरीप हंगामानंतर शेत स्वच्छ करण्यात आले. विहिरीला पाणी असल्याने गव्हाची पेरणी केली जात आहे. खरीप हंगाम वाया गेला, तरी रब्बी हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया खमताणे येथील शेतकरी उमेश खैरनार यांनी दिली.आठवडाभरात पेरण्यांच्या कामांना वेग येईल. कांद्याला सध्या मिळत असलेला दर पाहता यावर्षी उन्हाळा कांदा मोठ्या प्रमाणावर लागवड होण्याची शक्यता आहे. अतिपावसामुळे कांद्याच्या उळ्याचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा बियाणे टाकून कांदा रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला.