अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल

By admin | Published: April 23, 2017 02:27 AM2017-04-23T02:27:50+5:302017-04-23T02:28:10+5:30

नाशिक : शेतात अनाधिकारे घुसून मोजणी केली अशा अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला

Cops filed against the officials | अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल

अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल

Next

 नाशिक : समृद्धी महामार्गाच्या जागा मोजणीस विरोध दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांवर चॅप्टर केसेस करण्याचा प्रकार म्हणजेच कायद्याचा दुरुपयोग असून, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी जागा मालकांच्या शेतात अनाधिकारे घुसून मोजणी केली अशा अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल करून न घेतल्यास न्यायालयात जाऊन दाद मागण्याचेही यावेळी ठरविण्यात आले आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील शिवडेसह पाच गावातील शेतकऱ्यांनी जागा मोजणीस विरोध दर्शविल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून मोजणीचे काम ठप्प झाले असून, शासकीय अधिकाऱ्यांना थेट गावबंदीच करण्यात आल्यामुळे पोलीस प्रशासनाने जागा मालक शेतकऱ्यांना चॅप्टर केसेसच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यावर विचार विमर्श करण्यासाठी तसेच येत्या २६ एप्रिल रोजी शहापूर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याने त्याची तयारी म्हणून संघर्ष समितीची बैठक अ‍ॅड. दामोधर पागेरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून पोलीस यंत्रणेने शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरविण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला. सनदशीर मार्गाने जागा मालकांनी मोजणीस विरोध केला, कोणत्याही शासकीय मालमत्तेचे नुकसान केलेले नाही असे असताना त्यांच्यावर चॅप्टर केसेस करण्यात येत असल्याबद्दल शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
या बैठकीस कॉ. राजू देसले, अ‍ॅड. रतनकुमार इचम, भास्कर गुंजाळ, सोमनाथ वाघ, शांताराम ढोकणे, ज्ञानेश्वर चव्हाण, रावसाहेब हरक, किरण हरक, विष्णुपंत वाघचौरे, सुभाष सातपुते, जगन्नाथ घोडके, महादू तुपे, सुनील तुपे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Cops filed against the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.