नाशिकने केली पुण्याची कॉपी
By admin | Published: December 15, 2015 12:23 AM2015-12-15T00:23:14+5:302015-12-15T00:24:17+5:30
स्मार्ट सिटी : पुणे मनपाच्याच बव्हंशी अटी
नाशिक : ‘पुणे तेथे काय उणे’ अथवा पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटले जाते ते उगाचच नव्हे. स्मार्ट सिटीअंतर्गत एसपीव्हीबाबत निर्णय घेताना पुणे महापालिकेने अटी-शर्तींचा जो काही ठराव केला त्यातील बव्हंशी अटींची कॉपी करत नाशिक महापालिकेनेही आपला ठराव तयार करत पुणेकरांची ‘हुशारी’ मान्य केली.
पुणे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावर निर्णय न घेता प्रस्ताव तहकूब ठेवला होता. परंतु मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर सोमवारी पुणे महापालिकेची महासभा होऊन अटी-शर्ती लादून एसपीव्हीला मान्यता देण्यात आली. पुणे महापालिकेची महासभा सुरू असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनपेक्षितरीत्या यू-टर्न घेतल्याने नाशिक महापालिकेतही सत्ताधारी मनसेसह एसपीव्हीला विरोध करणाऱ्या पक्षांची धांदल उडाली. सायंकाळी तातडीने महापौरांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावत चर्चा केली. मात्र, याचवेळी एसपीव्हीचा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित करणारे उपमहापौर गुरुमित बग्गा पुणे महापालिकेच्या महासभेच्या कामकाजावर लक्ष ठेवून होते. पुणे महापालिकेने अटी-शर्तींसह तयार केलेला ठराव त्यांनी तातडीने मागवून घेतला आणि त्यातीलच बव्हंशी अटी टाकून नाशिक महापालिकेचाही ठराव उपसूचनांसह तयार करण्यात आला. या ठरावाचे माध्यम प्रतिनिधींसमोर जाहीर वाचन करून त्यांनी गटनेत्यांची संमतीही घेतली आणि त्यावर लगोलग स्वाक्षऱ्याही घेऊन टाकल्या. (प्रतिनिधी)