मराठी विषयालाही कॉपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2016 12:23 AM2016-03-02T00:23:58+5:302016-03-02T00:27:24+5:30
गैरमार्ग : जिल्ह्यात २०, तर विभागात २८ प्रकरणें
नाशिक : माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा मंगळवारपासून (दि. १) सुरू झाल्या. आज प्रथम भाषा म्हणून विद्यार्थ्यांनी मराठीचा पेपर दिला. दरम्यान, जिल्ह्यात वीस, तर विभागात २८ परीक्षार्थींनी कॉपीचा गैरमार्ग अवलंबला.
दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून ९४ हजार १६९ परीक्षार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. विभागातील विद्यार्थ्यांची संख्या दोन लाख आठ हजार ६४० इतकी आहे. जिल्ह्यातील १८४ केंद्रे परीक्षार्थींसाठी मंडळाने उपलब्ध करून दिली आहेत. नेहमीप्रमाणे नाशिक विभागातील सर्वात कमी परीक्षार्थी नंदुरबार जिल्ह्यातून प्रविष्ट झाले आहेत. सर्वच केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी मंडळाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तरीदेखील येवला तालुक्यातील पाटोदा केंद्र क्रमांक १६२० येथे दहा, कळवण तालुक्यातील मानूर केंद्रावर (क्रमांक १२७०) चार, १२५० केंद्रात चार आणि सुरगाणा केंद्रावर दोन अशा एकूण वीस परीक्षार्थींनी कॉपी करण्याचे धाडस तिसऱ्या डोळ्यादेखत केले.
जिल्ह्याच्या भरारी पथकाने सदर केंद्रांवर अचानकपणे भेट देत कॉपीबहाद्दर शोधून काढल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी दिली. दहावीची परीक्षा सुरळीत पार पडावी व कॉपीसारख्या गैरमार्गापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करता यावे, यासाठी मंडळाकडून सर्वतोपरी प्रयत्न के ले जात आहेत.
केंद्रांवरील पोलीस बंदोबस्तापासून तर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यापर्यंत तसेच भीत्तीपत्रे व शिक्षकांमार्फत प्रबोधनातूनही कॉपी रोखण्याचे प्रयत्न होत आहेत; मात्र तरीदेखील ग्रामीण भागातील काही संवेदनशील केंद्रांवर तसेच सामान्य केंद्रांवरही कॉपीचे प्रकार आढळून येत असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. (प्रतिनिधी)