कोथिंबीर फक्त ५० पैसे
By admin | Published: August 27, 2016 12:25 AM2016-08-27T00:25:56+5:302016-08-27T00:26:08+5:30
मार्केट कमिटी आवारात शेतकऱ्यांनी फेकली कोथिंबीर
पंचवटी : काही महिन्यांपूर्वी सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या कोथिंबीर मालाची शुक्र वारी आवक वाढल्याने कोथिंबीरला अक्षरश: ५० पैसे जुडी इतका भाव मिळाला. कोथिंबीरला मातीमोल बाजारभाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीतीच कोथिंबीर सोडून देत घरचा रस्ता धरला.कोथिंबीरची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने काही शेतमालाचा लिलाव झाला, तर काही शेतमाल व्यापाऱ्यांनी खरेदी न केल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव शेतमाल बाजार समितीत टाकून द्यावा लागला. मातीमोल बाजारभाव मिळाल्याने लागवडीचा खर्च व गाडी भाडेही निघाले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
बाजार समितीत कोथिंबीर ५० रुपये शेकडा दराने विक्री झाली. गुरुवारी गोकुळाष्टमी असल्याने गुजरातला मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी कोथिंबीर खरेदी केली होती; मात्र शुक्रवारी आवक वाढल्याने व त्यातच बाजारभाव कोसळल्याने व्यापाऱ्यांनी कोथिंबीर माल खरेदी करण्यास नकार दर्शविला. शुक्र वारी सायंकाळी कोथिंबीरची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे ढासळले.
कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव न झाल्याने सुमारे २५ ते ३० क्विंटल कोथिंबीर शेतकऱ्यांनी फेकून दिली. (वार्ताहर)