कोरोनामुळे मालमत्ता कर वसुलीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 11:00 PM2020-08-07T23:00:44+5:302020-08-08T01:06:59+5:30
कोरोनाचा फटका थेट महापालिकेच्या तिजोरीला बसला आहे. मालमत्ता कर वसुलीवर परिणाम झाल्याने विकासकामांना खीळ बसणार आहे. आतापर्यंत केवळ २२ कोटी २६ लाख ३८ हजार ४० रुपये मालमत्ता कराची वसुली झाली आहे.
मालेगाव : कोरोनाचा फटका थेट महापालिकेच्या तिजोरीला बसला आहे. मालमत्ता कर वसुलीवर परिणाम झाल्याने विकासकामांना खीळ बसणार आहे. आतापर्यंत केवळ २२ कोटी २६ लाख ३८ हजार ४० रुपये मालमत्ता कराची वसुली झाली आहे.
गेल्या १२ मार्चपासून वसुलीवर परिणाम झाला आहे. प्रारंभी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. मालमत्ता कर वसुलीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोना रोखण्यासाठी कार्यरतरहावे लागले. परिणामी घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीवर याचा परिणाम झाला. घरपट्टीची मागणी ४६.७० कोटी असताना केवळ ५६ लाख ९३ हजार १७८ रुपये वसूल झाले आहे. ५०.५१ टक्केच वसुली झाली आहे, तर पाणीपट्टीची २१ कोटी ५२ लाख मागणी असताना केवळ ८ कोटी ६९ लाख ४४ हजार ८६२ रुपये वसूल झाले आहे. ३४.७५ टक्केच वसुली झाल्यामुळे याचा परिणाम थेट महापालिकेच्या तिजोरीवर होणार आहे. शासन अनुदानित विकासकामे मार्गी लागणार असले तरी महापालिकेच्या अंदाजपत्रकात व विकासकामांना खीळ बसणार आहे. वसुली व मासिक खर्चात त्यामुळे तफावत निर्माण झाली आहे. महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे पुढील दीड ते दोन वर्षे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे चिन्हे दिसत नाही. महापालिकेकडून कोरोनाच्या उपाययोजनेसाठी निधी राखीव केला गेला आहे. सध्या महापालिकेला जीएसटीतून केवळ १४ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे. यातूनच महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून इतर खर्च भागविला जात आहे.