दोघे अधिकारी बाधित : इंदिरानगर पोलीस ठाण्यात पुन्हा ‘कोरोना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 02:46 PM2020-07-06T14:46:02+5:302020-07-06T14:46:33+5:30
त्यावेळी वडाळा परिसरात कर्तव्यावर असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी दोघांची प्रकृती सुधारली असली तरी इंदिरानगर पोलीस ठाण्याला व शहर पोलीस आयुक्तालयाला आपला एक कर्मचारी या कोरोनाच्या लढाईत गमवावा लागला
नाशिक : पोलीस ठाण्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून या पोलीस ठाण्यात कार्यरत दोघा उपनिरिक्षकांचे कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपुर्वीच याच पोलीस ठाण्यातील एका कोरोनाबाधित रूग्णाची उपचारादरम्यान सुरू असलेली झुंज अपयशी ठरली होती.
इंदिरानगर पोलीस ठाण्यातील वडाळागाव भागात साधारणत: महिनाभरापुर्वी मोठ्या संख्येने कोरोनाचे रूग्ण आढळून येत होते. यामुळे वडाळा हे शहराचे नवीन हॉटस्पॉट बनले होते. त्यादरम्यान, मनपाने गाव कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त याठिकाणी वाढविण्यात आला. सादिकनगर, महेबुबनगर, साठेनगर, गुलशननगर या भागात कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून येत होते. यामुळे या परिसरावर पोलिसांनी गावठाणपेक्षा अधिक लक्ष केंद्रीत केले होते. सातत्याने पोलीस गस्त आणि नागरिकांना घरात बसण्यास आवाहन केले जात होते. दुकाने या भागात उघडणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेतली जात होती. त्यावेळी या परिसरात कर्तव्यावर असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी दोघांची प्रकृती सुधारली असली तरी इंदिरानगर पोलीस ठाण्याला व शहर पोलीस आयुक्तालयाला आपला एक कर्मचारी या कोरोनाच्या लढाईत गमवावा लागला आहे.
काही दिवसांपुर्वीच येथील कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असतानाच पुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस उपनिरीक्षक कर्तव्य बजावताना कोरोनाबाधित झाल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल आहे; मात्र घाबरण्याचे कारण नसून दोघा अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले, अशी माहिती सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी दिली.