कोरोनामुळे आॅनलाइन घरपट्टीतही मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:45 AM2020-05-27T00:45:38+5:302020-05-27T00:48:28+5:30

कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेला घरपट्टीची बिले प्रत्यक्ष मिळकतधारकाला देता येणार नसल्याने आॅनलाइनचा पर्याय वापरण्याचे आवाहन करण्यात आले खरे, परंतु बंद उद्योगधंद्यामुळे त्यातही गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९० लाख रुपयांची घट आली आहे.

Corona also caused a big drop in online homeownership | कोरोनामुळे आॅनलाइन घरपट्टीतही मोठी घट

कोरोनामुळे आॅनलाइन घरपट्टीतही मोठी घट

Next
ठळक मुद्देसवलतीत पुन्हा वाढ : महापालिकेकडून ई-बिल पाठविणार

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेला घरपट्टीची बिले प्रत्यक्ष मिळकतधारकाला देता येणार नसल्याने आॅनलाइनचा पर्याय वापरण्याचे आवाहन करण्यात आले खरे, परंतु बंद उद्योगधंद्यामुळे त्यातही गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९० लाख रुपयांची घट आली आहे.
चौथ्या लॉकडाउनमध्ये काही व्यवसाय सुरू झाल्याने आता नागरिक घरपट्टी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने मेपर्यंत असलेली आगाऊ बिल भरण्याबद्दल देण्यात येणारी पाच टक्के सवलत आता जून महिन्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरच्या दोन महिन्यात तीन आणि दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवार (दि.२७)पासून ई-बिल (डिमांड) देखील देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात घरपट्टीचा मोठा वाटा असून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सव्वाशे कोटी रुपयांवर वसुली झाली आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वसुलीची धावपळ सुरू होणार असतानाच लॉकडाउन झाल्याने महापालिकेच्या वसुलीवर प्रतिकूल परिणाम झाला.
मे महिन्यात तीन तर जून महिन्यात दोन टक्के सवलत दिली जाते, त्याशिवाय आॅनलाइन सेवेमुळे अतिरिक्त एक टक्का सवलत देण्यात येते. त्यानुसार २०२०-२१ या नवीन आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तिमाहित आॅनलाइन भरणा करण्यासाठी सवलत देण्यात आली. परंतु नागरिकांचा आॅनलाइन कर भरणा करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या वर्षी १ एप्रिल ते २१ मार्चदरम्यान ९ कोटी ७ लाख ६५ हजार ५०५ रुपये आॅनलाइन घरपट्टी जमा झाली होती. मात्र, यावर्षी याच कालावधीत मात्र सहा कोटी २३ लाख ३२ हजार ८६२ रुपये आॅनलाइन कर भरणा झाला असून ही तूट २ कोटी ९० लाख रुपयांची आहे. त्यामुळे घरपट्टी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने जून महिन्यापर्यंत ठेवलेली पाच टक्के बिलाची आणि एक टक्का आॅनलाइन पेमेंटची सवलत आता वाढवून जून महिन्यापर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यानंतर म्हणजे जुलैमध्ये तीन अधिक एक असे चार टक्के तर आॅगस्टमध्ये दोन अधिक एक असे तीन टक्के सवलत दिली जाणार आहे. याशिवाय अनेक उद्योजक व्यावसायिकांना घरपट्टीसाठी डिमांड बिल लागते तेदेखील ई-बिल आॅनलाइन मिळू शकणार आहे. बुधवारपासून (दि. २७) हे बिल मिळू शकेल. त्यात शास्तीचादेखील उल्लेख असणार आहे.
नागरिकांना एसएमएसद्वारे सूचना
महापालिकेकडे घरपट्टी भरताना नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवर बिल भरण्याची सूचना आणि रक्कम आणि लिंक पाठविली जात आहे. दररोज सुमारे वीस हजार नागरिकांना बल्क एसएमएस पाठवले जात आहेत. दोन दिवसांपासून अशाप्रकारे बल्क एसएमएस पाठविण्यास सुरुवात झाली आहे.
नव्या आर्थिक वर्षात महापालिकेने घोषित केल्यानुसार आॅनलाइन घरपट्टी भरल्यास महापालिकेच्या बिलाची वाट न बघता स्वत: पुढाकार घेऊन पट्टी भरल्याबद्दल पाच टक्के, आॅनलाइन घरपट्टी भरल्यास अधिक एक टक्का अशी सवलत दिली जाते. तर सोलरवॉटर घरी असेल आणि त्याची अधिकृत नोंद महापालिकडे केली असेल तर पाच टक्के सवलत दिली जाते.

Web Title: Corona also caused a big drop in online homeownership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.