कोरोनामुळे दुसऱ्या वर्षीही विवाह लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:00+5:302021-04-27T04:15:00+5:30
आपली लेक चांगल्या घरात जावी असे प्रत्येक वधूपित्याला वाटते. आपला जावईबापू नोकरीवाला असावा, त्याच्या घरी शेती, बिल्डिंग, चारचाकी असावी. ...
आपली लेक चांगल्या घरात जावी असे प्रत्येक वधूपित्याला वाटते. आपला जावईबापू नोकरीवाला असावा, त्याच्या घरी शेती, बिल्डिंग, चारचाकी असावी. आपल्या मुलीला सुखी ठेवेल
असाच जावई वधूपिता शोधत आहेत, पण शंभरात वीस -तीस टक्केच जावई चांगले मिळतात.
त्यामुळे वधू पित्याच्या अपेक्षा वाढल्याने विवाह सोहळे लांबणीवर पडत आहेत.
२०२० वर्षा पाठोपाठ २०२१ ही कोरोनाच्या सावटाखाली लग्न जमणे कठीण झाले आहे, अनेक विवाह नात्यागोत्यात होत आहेत. त्यातही भाचा चांगला असला तरी मामी मुलगी देऊ देत नसल्याने बऱ्याच नात्यामध्ये विघ्न येऊ लागली आहेत.
अशा एक ना अनेक समस्या वधू पित्यासमोर आहेत.
मुलगी द्यायची म्हटल्यावर नवरदेव व्यसनी आहे का या शोधात मुलीचे वडील अनेक चौकशा करतात, त्यातून जर निर्व्यसनी मिळाला तर त्याचा विचार होतो, परंतु पुन्हा व्यसन करतो असे समजले तर निरोप येतो...आमचे दुसरीकडे चालू आहे.
पूर्वी वरपित्याकडून वरदक्षिणा, मानपान, कपडे, भांडी, अगदी सर्व संसाराची मागणी केली जात असे, परंतु सध्या कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुलगी द्या हो, अशी विनवणी वरपित्याकडून होताना दिसते. वधू पित्याकडून नोकरदार मुलांची मागणी केली जाते परंतु कोरोनाने सर्व सूत्र बदलल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. त्यामुळे नोकरीवालाच पाहिजे ही मानसिकता बदलत असून मोठा शेतकरी, व्यवसायधारक अशा नवरदेवांना मागणी वाढली आहे.