घंटागाडीतून कोरोना जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:15 AM2021-04-07T04:15:10+5:302021-04-07T04:15:10+5:30
निष्काळजी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी नाशिक : मास्क वापरण्याची काळजी ग्राहकांकडून घेतली जात असली तरी रस्त्यावरील विक्रेते आणि अनेक दुकानदार ...
निष्काळजी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
नाशिक : मास्क वापरण्याची काळजी ग्राहकांकडून घेतली जात असली तरी रस्त्यावरील विक्रेते आणि अनेक दुकानदार फारशी याबाबत काळजी घेताना दिसत नाहीत. विक्रेत्यांना हॅण्डग्लोजची सक्ती करावी, मास्क वापरण्याबाबत ताकीद देण्यात यावी तसेच पैसे हाताळण्याबाबतही समज देण्यात यावेत, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. विशेषत: फळविक्रेत्यांकडून काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते.
स्वीट मार्टमधील खाद्यपदार्थ उघड्यावरच
नाशिक : शहरातील काही भागामध्ये स्वीट मार्ट दुकानदारांकडून खाद्यपदार्थ्यांची काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. स्वीट मार्टमध्ये बनविण्यात आलेले स्नॅक्स हे उघड्यावरच ठेवले जात आहे. ग्राहकांना या वस्तू देतानादेखील कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. दुकानात आलेल्या ग्राहकांच्या हातावर सॅनिटाझर लावणे अपेक्षित असून, दुकानदाराने ग्लोज वापरणे सुरक्षित आहे. मात्र दुकानदारांकडून बेफिकिरी दाखविली जात आहे.
जेलरोड-मानूर मार्गावर प्रवासी वाहतूक
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने प्रवासी वाहतुकीवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र जेलरोड-नांदूर मार्गावर रिक्षातून दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जात आहे. निर्बंध असतानाही अशाप्रकारची वाहतूक सुरूच असल्याचे दिसते. जेलरोड-नाशिकरोड मार्गावरही नियमबाह्य वाहतूक सुरू असल्याचे दिसते.
परवानगी नसलेले दुकाने मागील दाराने सुरू
नाशिक : कठोर निर्बंध यंदा जीवनाश्यक दुकानांदेखील आहेत. त्यांना रात्री ८ वाजेपर्यंतची परवानगी आहे, तर इतर सर्व दुकाने बंद आहेत. मात्र अशी दुकाने मागल्या दाराने सुरू असल्याचे उपनगर, जेलरोड परिसरात दिसून येते. मावा, तंबाखू, सिगारेट, घरगुती साड्यांची दुकाने, कापड विक्रेते, टेलरिंग, मसाल्याची दुकाने, कांडपयंत्रे आदी अनेक दुकाने मागल्या दाराने सुरू आहेत. ग्राहकांशी फोनवरून संपर्क साधून व्यवसाय केला जात आहे.
फेरीवाले पोहोचले झोपडपट्टी भागात
नाशिक : शहरातील झोपडपट्टी, गावठाण तसेच काही कॉलनी, सोसायटी परिसरात वडेपाववाले घरोघरी जाऊन विक्री करू लागले आहेत. या विक्रेत्यांना फोन करून त्यांना खाद्यपदार्थांची ऑर्डरदेखील दिली जात आहे. सुरक्षित अंतर राखण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात असल्यातरी अप्रत्यक्षपणे या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या या व्यवसायामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.