कोरोनामुळे संगणक शिक्षणाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:40+5:302021-06-16T04:18:40+5:30
संबंधित प्रमाणपत्र सरकारी नोकरी करताना राज्य शासनाने अनिवार्य केले असून, जे सरकारी कर्मचारी अजूनही एमएस-सीआयटी उत्तीर्ण होऊ शकले ...
संबंधित प्रमाणपत्र सरकारी नोकरी करताना राज्य शासनाने अनिवार्य केले असून, जे सरकारी कर्मचारी अजूनही एमएस-सीआयटी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत त्यांची संधी हुकली आहे. वास्तविक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून हे शिक्षण घेणे शक्य असतानाही विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे, तर केंद्र संचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
एमकेसीएलमार्फत एमएस-सीआयटीचे ज्ञान संगणक प्रशिक्षण केंद्रातून दिले जाते. दरवर्षी एमएस-सीआयटीचे किमान सात सत्र होतात. मात्र दि. २३ मार्च २०२० पासून संगणकीय ज्ञान देणाऱ्या केंद्रांची कवाडेच बंद झाली आहेत. त्याचा परिणाम युवकांच्या भविष्यावर जाणवणार आहे.
शाळा-महाविद्यालये बंद असल्याने घरीच ऑनलाइन शिक्षण घेतले जात आहे. त्यात अनेक जण संगणक प्रशिक्षणाचा जोड अभ्यासक्रम करत असतात; परंतु त्यांनाही या शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात जवळपास २०० हून अधिक संगणक प्रशिक्षण केंद्र आहेत. या केंद्रचालकांचेही मोठे नुकसान होत आहे.
इन्फो
परवानगी देण्याची मागणी
जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या कालावधीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोविडच्या काही अटी व शर्तींसह क्लास सुरू करण्यास परवानगी दिली होती. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून, पुन्हा मागील नियमावलीसह क्लास सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी क्लास संचालकांकडून करण्यात येत आहे. कोविडविषयक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याची ग्वाहीही केंद्रचालकांकडून दिली जात आहे.
कोट...
प्रत्येक केंद्रावर विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. युवकांना अनेक ठिकाणी त्यातून नोकऱ्यासुद्धा मिळतात. कोणत्याही वयातील विद्यार्थी हा संगणक प्रशिक्षण घेत असतो. शक्यतो दहावीनंतर संगणक प्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल असतो. कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्र बंद असल्यामुळे आतापर्यंत जवळपास दहा बॅचचे नुकसान झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने केंद्र सुरू करण्याची त्वरित परवानगी द्यावी.
-राकेश पगार,
केंद्र संचालक,
एमएस-सीआयटी,
कळवण