कोरोनामुळे बस, मेट्रो सेवेला पुन्हा रेड सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:47+5:302021-05-28T04:11:47+5:30
राज्यातील फडणवीस सरकारने नाशिकसाठी देशातील पहिली टायरबेस्ड मेट्रो मंजूर केली. त्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला. दरम्यानच्या काळात राज्यात ...
राज्यातील फडणवीस सरकारने नाशिकसाठी देशातील पहिली टायरबेस्ड मेट्रो मंजूर केली. त्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याने मेट्रोला ब्रेक मिळेल, असे सांगितले जात होते. मात्र, या सरकारनेही पाठपुरावा केला आणि केंद्र शासनाने २,१०० कोटी रुपयांचा मेट्रो प्रकल्प मंजूर केला. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही केंद्र शासनाने ठरविल्यानुसार नाशिकमध्ये मेट्रोसाठी लागणारा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे मेट्रोला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली. महामेट्रोने तर नाशिक शहरात कार्यालय सुरू करण्यासाठी महापालिकेकडे जागाही मागितली. मात्र, फेब्रुवारी अखेरनंतर शहरात कोरोनाने डाेके वर काढले आणि त्यामुळे सर्व तयारीवर पाणी फेरले गेले. मेट्रोचे सर्व काम ठप्प झाले आहे. मेट्रोपेक्षाही बससेवेची तयारी वेगाने सुरू झाली होती. गेल्या मार्चपासून सुमारे शंभर बस ओझरजवळ उभ्या आहेेत. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर महापालिकेने तिकीट दर निश्चितीची तयारी केली हेाती. तसा प्रस्ताव आरटीएला (प्रादेशिक परिवहन प्राधिकरण) पाठविला होता. मात्र, त्यांची बैठकच होऊ शकली नाही. एकीकडे महापालिकेने बससाठी लोगो, मनुष्यबळ, बँकिंग सेवा असे सर्वच अंतिमत: मंजूर केले असताना, दुसरीकडे मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही सेवा ठप्प झाली आहेे.
कोट.
सध्या केवळ कोरोनाचा विषय पटलावर आहे. त्यातच तिसऱ्या लाटेच्या तयारीवर भर सुरू असल्याने बससेवेचा विषय बाजूला आहे. संसर्ग वाढू नये, यासाठी मुळातच सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे बससेेवेचा विषय सध्या नाही.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
इन्फो..
परिवहन महामंडळाची तयारी नाही.
गेल्या वर्षीही मेट्रो आणि बससेवेची तयारी सुरू असतानाच कोरोनाचे संकट उद्भवले होते. त्यामुळे बससेवेची तयारी थांबली होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याची पुनरावृत्ती झाली आहे. विशेष म्हणजे निर्बंध शिथिल झाल्यानंतरही राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू केली नव्हती. आताही चार तालुक्यात बससेवा सुरू झाली असली, तरी शहरात मात्र अशी सेवा सुरू करण्याची महामंडळाची तयारी नाही.