कोरोनामुळे अभयारण्यांमध्ये "नो-एन्ट्री"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:14+5:302021-05-11T04:15:14+5:30
---------- नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारकडून विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक कारणांव्यतिरिक्त जिल्ह्याबाहेर प्रवासावरही बंदी ...
----------
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारकडून विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक कारणांव्यतिरिक्त जिल्ह्याबाहेर प्रवासावरही बंदी असून हौशी पर्यटक आणि वन्यजीवप्रेमींची गर्दी टाळण्यासाठी नाशिक वनवृत्तातील चारही अभयारण्य महिनाभरापासून बंद ठेवण्यात आले आहेत. शासनाच्या पुढील आदेशापर्यंत अभयारण्याच्या वाटा खुल्या होणार नसल्याची माहिती नाशिक वन्यजीव विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
नाशिक वनवृत्तात निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर, अहमदनगरचे कळसूबाई-हरिश्चंद्रगड, जळगावचे यावल आणि धुळ्यातील अनेर डॅम या चार प्रमुख अभयारण्यांचा समावेश होतो. कोरोनाची दुसरी लाट सर्वत्र वेगाने पसरल्याने शासनाची मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांनुसार हे सर्व अभयारण्ये एप्रिलच्या सुरुवातीपासूनच बंद करण्यात आल्याची माहिती वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली. यामुळे हौशी पर्यटकांनी अभयारण्यांमध्ये प्रवेश करणे कटाक्षाने टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यांमध्ये सध्या पक्ष्यांची संख्याही कमी झालेली आहे. सध्या हा पक्षी निरीक्षणाचा हंगाम नसल्याने येथे पर्यटक फारसे फिरकत नाहीत; मात्र कळसूबाई-हरिश्चंद्रगड, यावलसारख्या अभयारण्यांमध्ये वन्यजीवांच्या आकर्षणापोटी पर्यटकांचा उन्हाळ्यात वावर असतो. कारण उन्हाळ्यात वन्यजीव पाण्याच्या शोधात पाणवठ्यावर येतात. कळसूबाई अभयारण्य क्षेत्रातील भंडारदरा, राजूर वनक्षेत्रात गस्त वाढविण्यात आली आहे तसेच येथील नाक्यांवरसुद्धा बंदोबस्त वाढविला असून सीसीटीव्ही कॅमेरेही काही नाक्यांवर कार्यान्वित करण्यात आले आहेत. अभयारण्यांमध्ये असलेल्या गावांतील गावकऱ्यांव्यतिरिक्त कुठल्याही पाहुण्यांना सध्या प्रवेश दिला जात नसल्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले.
---इन्फो---
राजापूर-ममदापूर संवर्धन क्षेत्रातही प्रवेशास मज्जाव
_
येवल्यातील राजापूर-ममदापूर काळवीट संवर्धन क्षेत्रही पर्यटकांचे आकर्षण राहिलेले आहे. या संवर्धनक्षेत्रात काळवीट या अत्यंत दुर्मिळ वन्यप्राण्याचा मुक्त संचार आढळून येतो. यामुळे पर्यटक येथे भेट देतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे संवर्धन क्षेत्रदेखील नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याचे सहायक वनसंरक्षक डॉ.सुजित नेवसे यांनी सांगितले. कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने माणसांपासून वन्यप्राण्यांनाही धोका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवर्धन क्षेत्रात प्रवेश करणे टाळावे, असे आवाहन नेवसे यांनी केले आहे.
----इन्फो----
वन्यजीव मुक्त असल्याने सुरक्षित
नाशिक वनवृत्तात बिबट्या, काळवीट, वानर, माकड, तरस, रानडुकरे, रानमांजर, मोर, कोल्हे, लांडगे आदी वन्यजीवांचा वावर आढळून येतो. हे सर्व वन्यप्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करत असून त्यांचा माणसांशी संपर्क येत नाही. यामुळे कोरोनाचा संसर्ग वन्यप्राण्यांना होण्याचा धोका टळतो. त्यामुळे या भागात ''कोरोना अलर्ट'' जारी करण्यात आलेला नाही, येथील वन्यजीव कोरोनासारख्या आजारापासून सुरक्षित असल्याचा दावा वन्यजीव विभागाच्या सूत्रांनी केला आहे.
----
फोटो nsk वर सेंड केले आहेत