कोरोनामुळे कुटुंब, नात्यांमध्ये झाला ' दुरावा '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:59+5:302021-04-29T04:11:59+5:30

नाशिक : कोरोनामुळे गेल्या वर्षापासून अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, कोणाचे आई, वडील तर कोणाचा मुलगा, मुलगी या ...

Corona causes 'separation' in family, relationships | कोरोनामुळे कुटुंब, नात्यांमध्ये झाला ' दुरावा '

कोरोनामुळे कुटुंब, नात्यांमध्ये झाला ' दुरावा '

Next

नाशिक : कोरोनामुळे गेल्या वर्षापासून अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, कोणाचे आई, वडील तर कोणाचा मुलगा, मुलगी या विषाणूला बळी पडले आहेत. प्रत्येकावर मोठा आघात होत असताना आप्तस्वकियांकडून अशा व्यक्तींचे सांत्वन करतानाच काही मोलाचे सल्लेही दिले जात आहेत. मात्र अपवादात्मक परिस्थितीत अशा सल्ल्यामुळे संबंधितांना जीव गमवावा लागला तर मात्र सारा दोष सल्ला देणाऱ्याच्या माथी फोडला जात असल्याने अनेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यातून वाद-विवादाचे प्रसंगही झडू लागले आहेत.

कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याने अनेकांनी धास्ती घेतली आहे. तर कोरोना बरा होतो तुम्ही काळजी करू नका असे सांगून घरच्या घरी उपचार करा असा सल्ला दिला जात आहे. घरीच उपचार करणाऱ्या रूग्णाची ऐनवेळी प्रकृती चिंताजनक झाल्याने सल्ला देणाऱ्या जवळच्या नातेवाईकांत दुरावा निर्माण झाला आहे. जवळच्या नातेवाईकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कोरोना बाधित रुग्णाला रुग्णालयात न नेता घरच्या घरीच उपचार करणे देखील काहींच्या जीवावर बेतले असल्याने रक्ताच्या नात्यात फूट पडली आहे त्यातून जवळच्या नातेवाईकांच्या विशेषतः सख्ख्या नातेवाईकाच्या शुभ कार्यात तर सोडाच परंतु कोणी मृत्यू झाले तरी त्यांच्या अंत्यसंस्काराला न जाणे इथपर्यंत कौटुंबिक संबंध खराब होऊ लागले आहेत.

कोरोना विषाणू संसर्ग होण्यापूर्वी एकमेकांच्या शुभ कार्यात किंवा दुःखमय प्रसंगी धावून जात एकमेकांना सर्वोतोपरी मदत करणारे आता एकमेकांशी बोलणे तर सोडा एकमेकांकडे बघत नसल्याने कोरोनामुळे कौटुंबिक संबंध बिघडल्याचे चित्र आहे. कोरोना झाल्यानंतर रुग्णांची चौकशी केली नाही, रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी दाखल असल्याने आर्थिक मदत केली नाही तसेच फोन उचलला नाही, रुग्ण बरा झाला तरी भेटायला आले नाही किंवा अंत्यसंस्काराला आले नाही, दशक्रिया विधीला गैरहजेरी लावली अशी अनेकविध कारणे देखील नातेसंबंधातील दुराव्यास कारणीभूत ठरू लागली आहेत. काही कुटुंबातील सदस्यांना कोरोना संसर्गाला जबाबदार धरत, तुमच्यामुळे कुटुंबातील सदस्य किंवा जवळची व्यक्ती गमावली असे ठपकेही ठेवले जात असल्याने घरोघरी समज गैरसमजुतीतून सखे, सोयरे कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून दुरावले गेले आहेत.

Web Title: Corona causes 'separation' in family, relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.