कोरोना खबरदारी :नाशिककरांना यावे लागले ‘चौकटीत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 01:54 PM2020-03-28T13:54:46+5:302020-03-28T13:58:35+5:30
नाशिककरांना या ‘चौकटीत’उभे राहून वस्तूंची खरेदी करावी लागत आहे.
नाशिक : कोरोना आजाराचा प्रादूर्भावर रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला. यानंतर अवघे नाशिककरसुध्दा आपआपल्या घरात बंदिस्त झाले; मात्र काही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून सामाजिक अंतर राखले जावे, म्हणून प्रत्येक दुकानापुढे पांढऱ्या रंगाच्या चौकोन आखले गेले आहेत. त्यामुळे नाशिककरांना या ‘चौकटीत’उभे राहून वस्तूंची खरेदी करावी लागत आहे.
कोरोना आजाराचा फैलाव देशासह राज्यात वेगाने होऊ लागला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता १५६ झाला असून त्यापैकी ५ रुग्ण दगावले आहेत. सुदैवाने अद्याप नाशिकमध्ये कोणीही व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आली नाही. तसेच कोणीही कोरोना संक्रमित रूग्णालच्या संपर्कात आले नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. कोरोना संशयित रुग्ण मात्र दररोज आढळून येत असून त्यांच्यावर सरकारी दवाखान्यातील विलगीकरण कक्षात उपचारही सुरू आहेत. मुंबई, पुणे, सांगली, सातारा आदि शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शहरात लॉकडाऊन कालावधीत कोणीही रस्त्यावर फिरकणार नाही, याची पुर्णपणे खबरदारी घेतली जात आहे. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह घरात थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे नागरिकांना सातत्याने घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. दुध, भाजीपाला, किराणा माल, गोळ्या-औषधे, अन्नधान्य, पिठाची गिरणी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीनेच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तरीदेखील शहरातील काही भागांमध्ये याउलट चित्र पहावयास मिळत आहे. या सर्व वस्तू विक्रीच्या दुकानांबाहेर पांढ-या रंगाचे चौकोन आखले गेले आहेत. या चौकोनांमध्ये प्रत्येकी काही फूटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. या चौकोनात व्यक्तीने उभे राहून वस्तूंची खरेदी करावयाचा नियम शहरात कडक करण्यात आल्याचे दिसून येत आहे. भाजीबाजारातसुध्दा हातगाड्यांसमोर अशाप्रकारचे चौकोन बघावयास मिळत आहे. यांमुळे नाशिककर जणू चौकटीत आल्याचे चित्र दिसत आहे.
दुकानांच्या काऊंटरपुढे दोरी
शहरातील बहुतांश दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या काऊंटरपुढे दोरी बांधली आहे. काऊंटरपासून आलेले ग्राहक काही अंतर लांब उभे रहावे, याकरिता अशी शक्कल विक्रेत्यांकडून लढविली गेली आहे. विक्रे ते आलेल्या ग्राहकांना दुकानांसमोर आखलेल्या चौकटीत थांबण्याचे आवाहन करत आहेत.