नाशिकच्या हद्दीवर आता 'कोरोना चेक पोस्ट'; 24 तास प्रवाशांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 11:04 AM2020-03-22T11:04:26+5:302020-03-22T11:12:24+5:30

आजाराचा प्रसार केवळ सार्वजनिक ठिकाणच्या संसर्गामुळे वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे आजारी व्यक्ती लहान मुले वयस्कर व्यक्ती यांनी आगामी पंधरा ते वीस दिवस प्रवास टाळावा.

Corona Check Post now at Nashik border; 24 hour passenger inspection | नाशिकच्या हद्दीवर आता 'कोरोना चेक पोस्ट'; 24 तास प्रवाशांची तपासणी

नाशिकच्या हद्दीवर आता 'कोरोना चेक पोस्ट'; 24 तास प्रवाशांची तपासणी

Next

नाशिक : कोरोना या साथीच्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शहरात येणाऱ्या रस्त्यांवर निवडणूक कालावधीत उभारल्या जाणाऱ्या 'चेक पोस्ट' प्रमाणे कोरोना तपासणी नाके कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सर्व प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आपापल्या कार्यक्षेत्रातील, जिल्ह्यात व शहराकडे येणारे सर्व रस्त्यांवर टीम तयार करून निवडणुकीच्या काळात ज्याप्रमाणे चेकपोस्ट तयार केले जाते तसे ‘कोरोना चेकपोस्ट’ स्थापन करून प्रवाशांची तपासणी करावी असे त्यांनी म्हटले  आहे.

ही पथके गठीत करीत असताना त्यामध्ये विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांचे अथवा शिक्षकांच्या सेवा डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्टखाली अधिगृहीत करण्याचे सर्व अधिकार आपणास आहेत. नाशिक मध्ये येणारा प्रत्येक रस्ता, टोल नाका या सर्वांवर 24 तास तपासणी केली जावी, असे आदेशात म्हटले आहे.  या पथकाने प्रवाशांची तपासणी करून त्यामध्ये केवळ प्राथमिक माहिती घ्यावयाची आहे.

प्रामुख्याने सकृतदर्शनी कोणी परदेशातून अथवा अन्य कोरोनाबाधित जिल्ह्यातून येत असलेली व्यक्ती आहे काय, अशा व्यक्तीस सर्दी, खोकला, ताप अथवा अन्य काही आजार आहे. काय, होम क्वारांटाइन (HQ) शिक्का असलेली कोणी व्यक्ती आहे काय याबात माहिती विचारावी. जर यापैकी एकही बाब असलेली कोणी व्यक्ती त्या प्रवाशांमध्ये असेल तर प्रथम अशा व्यक्तीचा मोबाईल, दूरध्वनी क्रमांक, नाव, पत्ता इत्यादी माहिती रजिस्टरमध्ये नोंदवून घ्यावी. तसेच अशा व्यक्तीने ताबडतोब  स्थानिक आरोग्य केंद्रामध्ये जावे व आपली तपासणी करून घ्यावी, असे आदेश त्यांना द्यावेत असेही निर्देश श्री. मांढरे यांनी दिले आहेत.

तसेच या सूचना व आदेशांचे पालन तातडीने न केल्यास केल्या जाणाऱ्या फौजदारी कारवाई बाबत नागरिकांना  कल्पना द्यावी. तपासणीचे आदेश किती लोकांना दिले आहेत त्यांची नावे,पत्ता,दूरध्वनी क्रमांक यासह सविस्तर यादी दररोज संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे सर्व पथकांनी जमा करावी. तालुका आरोग्य अधिकारी यांनी त्यापैकी सर्व व्यक्तींनी अशी तपासणी करून घेतली आहे, याची शहानिशा करावी. त्यापैकी एखादी व्यक्ती शिल्लक राहिली असल्यास संबंधित पोलीस स्टेशन कडे अशी माहिती देऊन त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात यावे. या संपूर्ण कार्यवाही बद्दल संबंधित प्रांताधिकाऱ्यानी दररोज सायंकाळी 7 वाजता सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा, असेही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.

आगामी पंधरा दिवस प्रवास टाळावा-

या आजाराचा प्रसार केवळ सार्वजनिक ठिकाणच्या संसर्गामुळे वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे आजारी व्यक्ती लहान मुले वयस्कर व्यक्ती यांनी आगामी पंधरा ते वीस दिवस प्रवास टाळावा. इतर व्यक्तींनी देखील अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा, विनंती वजा आवाहन करताना कुठल्याही प्रकारचे आदेश,सूचना यांना प्रतिसाद न देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी  कळविले आहे.

 ‘कोरोना चेकपोस्ट’ कार्यपद्धती अशी

प्रांताधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर टीम तयार करून ‘कोरोना चेकपोस्ट’ तयार करणार. 
विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांचे अथवा शिक्षकांच्या सेवा डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्टखाली अधिगृहीत करणार.
जिल्हा व शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्ता, टोल नाका सर्वांवर 24 तास चालणार तपासणी केली जावी. परदेशातून आलेल्या अथवा क्वारनटाइन बाधित जिल्ह्यातील व्यक्तीची माहिती घेतली जावी.
सर्दी,खोकला,ताप,अन्य, होम क्वारांटाइन (HQ) शिक्का असलेली व्यक्ती याबात माहिती घ्यावी
व्यक्तीचा मोबाईल,दूरध्वनी क्रमांक, नाव, पत्ता इत्यादी माहिती रजिस्टरमध्ये नोंदवून तपासणीचे आदेश देणार. 
संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे सर्व पथक माहिती जमा कराणार. तपासणीची शहानिशा होणार.
दररोज सायंकाळी 7 वाजता सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा लागणा

Web Title: Corona Check Post now at Nashik border; 24 hour passenger inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.