मक्याला भोवला कोरोना, व्यापारी माल उचलेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 03:47 PM2020-03-14T15:47:11+5:302020-03-14T15:47:43+5:30
दरात घसरण : प्रतिक्विंटल १८०० रुपये दर देण्याची मागणी
सटाणा : कोरोनाचा इफेक्ट मक्याच्या दरात होऊन मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. त्यामुळे मालही व्यापारी उचलेनासे झाले आहेत. या घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, दिलासा देण्यासाठी शासनाने तत्काळ १८०० रु पये प्रतिक्विंटल दराने मका खरेदीसाठी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी सहकार व पणन मंत्री श्यामराव पाटील यांच्याकडे बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केली आहे. दरम्यान, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, चीनमधून जगभरात पोहोचलेल्या कोरोना विषाणूचा फटका मका उत्पादकांनादेखील बसला आहे. कोरोना व्हायरस आणि पोल्ट्री उत्पादन याचा कुठलाही संबंध नाही. चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पशुसंवर्धन मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट केले असले तरीदेखील सोशल मीडियावरील अफवांचा चिकन खरेदीवर परिणाम होत आहे. परिणामी प्रमुख कोंबडी खाद्य असलेल्या मका पिकाचीदेखील बाजारात मागणी घटल्याने दर कोसळले आहेत. आजच्या घडीला जवळपास ३५ ते ४० टक्के मका उत्पादकांकडे शिल्लक आहे. मात्र, बाजारभावात दिवसेंदिवस होणा-या घसरणीने मका उत्पादक चिंतित असून, महाराष्ट्रासह परप्रांतात मक्याची मागणी नाही. प्रत्येक दिवशी बाजारभावात घसरण होत असल्याने बाहेर पाठविलेला माल पुढील व्यापारी खाली करून घेत नाही. शासनाने याचा विचार करून तत्काळ मका प्रतिक्विंटल १८०० रु पये दराने मका खरेदीसाठी खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.