CoronaVirus: नाशिक विभागात कोरोनाचे संकट झाले आणखी गडद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:20 AM2020-04-29T05:20:34+5:302020-04-29T05:21:10+5:30
खांदेशातही ४ कोरोनाग्रस्त आढळून आल्याने बाधितांची संख्या ४८ वर पोहोचली आहे.
नाशिक : विभागात कोरोनाचे संकट गडद होत आहे. मालेगाव येथे एकाच दिवशी मंगळवारी ४४ ‘पॉझिटिव्ह’ आढळल्याने नाशिक जिल्ह्यातील बाधितांचा आकडा द्विशतकाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला. खांदेशातही ४ कोरोनाग्रस्त आढळून आल्याने बाधितांची संख्या ४८ वर पोहोचली आहे.
मालेगावला मंगळवारी सकाळी ३६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याला काही तास उलटत नाही तोच सायंकाळी आणखी १२ जण कोरोनाग्रस्त आढळल्याने बाधितांची संख्या ४८ वर पोहोचली. एकट्या मालेगावच्या कोरोनाग्रस्तांची संख्या १७१ झाली आहे.
खान्देशातही कोरोनाचा फैलाव वाढत आहे. जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात आणखी दोघे बाधित आढळले. जळगाव जिल्ह्यात मंगळवारी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोघा वृद्धांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी एकही बाधित आढळला नसल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला.
>स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू
नाशिकात पहिली खासगी कोरोना स्वॅब टेस्टिंग लॅब मंगळवारी सुरू झाली. या लॅबमधून पहिला टेस्टिंग अहवाल निगेटीव्ह आला आहे. नाशिकमध्येच स्वॅब तपासणी होणार असल्याने अहवाल लवकर मिळू शकणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आयसोलेशन कक्ष असलेली खास रेल्वेगाडी बनविली आहे. या रेल्वेचे नाशिकला आगमन झाले आहे. मालेगावी रुग्णांची वाढती संख्या लक्षात
घेऊन ही रेल्वे मनमाड स्थानकावर नेली जाणार आहे.