कोरोनामुळे ८३ शाळांतील २०४९ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:23+5:302021-07-21T04:12:23+5:30
नाशिक - कोरोना संकटामुळे नाशिक शहरातील ८३ शाळांमधील तब्बल २०४९ विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असल्याची बाब समोर ...
नाशिक - कोरोना संकटामुळे नाशिक शहरातील ८३ शाळांमधील तब्बल २०४९ विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असल्याची बाब समोर आली आहे. संबंधित विद्यार्थी स्थलांतरीत झाल्यामुळे अथवा संपर्क न होऊ शकल्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिल्याचे महापालिका शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.
कोरोना संकटामुळे यावर्षी अजूनही शहरातील शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचाच आधार मिळाला आहे. खासगी शिक्षण संस्थांनी तर ऑनलाइन शिक्षणावरच प्रामुख्याने भर दिला आहे. ही स्थिती शहरातील मनपा शाळांमध्येही दिसून येत असून, शहरातील १०१ शाळांमधील सुमारे १५ हजार २४३ विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. तर सुमारे ८८३८ विद्यार्थ्यांना मनपा शाळांमधील शिक्षक त्यांच्या परिसरात जाऊन शिकवत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंतही शिक्षणाचा प्रवाह पोहोचला आहे. शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला असला तरी अजूनही २०४९ विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचा संपर्कच होऊ शकलेला नाही. संबंधित विद्यार्थी कोरोनामुळे कुटुंबासमवेत स्थलांतरीत झाले असावेत, अथवा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे विद्यार्थी अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत.
मनपा शाळांमधील शिक्षणाची स्थिती
ऑनलाइन शिक्षण
शाळा -१०१
शिक्षक -८८०
विद्यार्थी -१५१४३
--
ऑफलाइन शिक्षण
शाळा - १०१
शिक्षक - ६५३
विद्यार्थी - ८८३८
--
शिक्षणापासून वंचित विद्यार्थी
शाळा ८३
विद्यार्थी - २०४९