कोरोनाने हिरावला विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:00+5:302021-03-07T04:14:00+5:30
नाशिक : यावर्षी जिल्ह्यातील भटक्या जाती व विमुक्त जमातीतील ४ हजार ५०० विद्यार्थिनींचा वार्षिक उपस्थिती भत्ता कोरोनाने हिरावून घेतला ...
नाशिक : यावर्षी जिल्ह्यातील भटक्या जाती व विमुक्त जमातीतील ४ हजार ५०० विद्यार्थिनींचा वार्षिक उपस्थिती भत्ता कोरोनाने हिरावून घेतला आहे. त्यात अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थिनींचा समावेश आहे. या विद्यार्थिनी ऑनलाईन उपस्थित आहेत. मात्र, कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्गात उपस्थित नसल्यामुळे त्यांचा वार्षिक भत्ता शासनाने स्थगित केला आहे. प्राथमिक शाळांमध्ये मुलींची उपस्थिती वाढावी, या उद्देशाने राज्य शासनाने अनुसूचित जाती, जमाती व भटक्या जाती, विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींसाठी वार्षिक उपस्थिती भत्ता योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी अनुसूचित जाती, भटक्या जाती, विमुक्त जमातीतील दारिद्र्यरेषेखालील ४ हजार ५०० विद्यार्थिनींसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता. हा सर्व निधी वितरीत करण्यात आला होता.
इन्फो-
दिवसाला एक रुपया भत्ता
शालेय कामकाजाच्या दिवसांपैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त दिवस शाळेत उपस्थित असणाऱ्या पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलींना एक रुपया प्रतिदिवस, असा एका शैक्षणिक वर्षांमध्ये २२० रुपये इतका उपस्थिती भत्ता दिला जातो.
शिक्षणाला मिळतो हातभार
सामान्य कुटुंबातून शाळेत येणेच कठीण आहे. त्यातच उपस्थिती भत्ता मिळत असल्याने शिक्षणाला हातभार लागतोय. आता भत्ताच मिळत नसल्याने अडचण होणार आहे.
- अनिता जाधव, विद्यार्थिनी
--
मुलींना दरवर्षीप्रमाणे उपस्थिती भत्ता मिळणे आवश्यक आहे. या उपस्थिती भत्त्यामुळे शाळेचा छोटा-मोठा खर्च करणे पालकांना शक्य होते.
- सविता उबाळे, विद्यार्थिनी
इन्फो-
दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्राथमिक शाळांमध्ये वर्ग सुरू झालेले नाहीत. यावर्षी ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने उपस्थिती भत्ता उपलब्ध झाला नसल्याचे शिक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले.
कोट-
ग्रामीण भागात अनेक शाळा सुरू आहेत, ज्या शाळा बंद आहेत अशाठिकाणी विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित राहतात. अशा विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता बंद करणे अन्यायकारक आहे.
- लकी जाधव, आदिवासी विकास परिषद
पॉईंटर
२०१९-२०
४ हजार ५०० भटक्या जाती, विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता
प्राप्त - १० लाख
वाटप १० लाख
२०१८-१९
३ हजार ६८९ भटक्या जाती, विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता
प्राप्त १० लाख
८ लाख ११ हजार ५८०