कोरोना इफेक्ट : ...आता कोर्टाच्या तारखेसाठीही करावी लागणार प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 05:51 PM2020-03-21T17:51:36+5:302020-03-21T17:58:27+5:30
नियमीत प्रकरणांच्या तारखांसाठी सुमारे महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निर्णयानंतर पक्षकारांची होणारी गर्दी नियंत्रणात येणार असल्याचा न्यायालय प्रशासनाला विश्वास आहे.
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यायालयांमध्येही कामकाजाची वेळ, कर्मचारी संख्या कमी करण्यात आली आहे; मात्र तरीही पक्षकारांची न्यायालयात गर्दी कायम असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी नवे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार नियमित प्रकरणांमध्ये पक्षकारांना चार आठवड्यानंतरची तारीख दिली जाणार आहे. तसे नवीन प्रकरणांचीही नोंदणी प्रक्रिया कायम सुरू राहणार आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनांनुसार आता न्यायालयीन कामकाज तीन तास तर न्यायालयाचे कार्यालयीन कामकाज चार तास सुरु आहे. गेल्या चार दिवसांपुर्वीच न्यायालयांमधील कामकाजाची वेळ मर्यादित करण्यात आली. याबरोबरच कर्मचाऱ्यांची संख्याही आता कमी करण्यात आली आहे. पक्षकार, वकील यांनाही न्यायालयात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले. तरीदेखील न्यायालयात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे वाघवसे यांनी पुढचा निर्णय घेत शनिवारी (दि.२१) नवे परिपत्रक जाहीर केले. त्यानुसार नियमीत प्रकरणांच्या तारखांसाठी सुमारे महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निर्णयानंतर पक्षकारांची होणारी गर्दी नियंत्रणात येणार असल्याचा न्यायालय प्रशासनाला विश्वास आहे. तसेच २४ आणि २७ मार्च रोजी किमान न्यायालयांद्वारे फक्त रिमांड व अत्यंत तातडीचे कामांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे सोमवारपासून (दि.२३) न्यायालयात केवळ न्यायाधीश व कर्मचारी यांच्या व्यतिरीक्त कोणाचीही हजेरी बंधनकारक नसल्याचेही वाघवसे यांनी पत्रिपत्रकात स्पष्ट केले आहे.