कोरोनामुळे आनंदावर विरजण, मेंदीऐवजी हातावर लागते सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:14 AM2021-05-07T04:14:58+5:302021-05-07T04:14:58+5:30
गावोगावी विवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या युवक-युवतींची संख्या मोठी आहे. मागील वर्षी आठवा गुरू असल्याने अनेकांची लग्ने होऊ शकली नव्हती, ...
गावोगावी विवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या युवक-युवतींची संख्या मोठी आहे. मागील वर्षी आठवा गुरू असल्याने अनेकांची लग्ने होऊ शकली नव्हती, तर काहींच्या घरगुती अडचणीमुळे लग्न जुळवताना विघ्ने आलीत. त्यामुळे अनेकांची येत्या दोन-तीन महिन्यात आपले लग्न होईल, अशी अपेक्षाही लागून राहिली होती. मात्र, कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कठोर उपाययोजना करीत संचारबंदी, तसेच जमावबंदी लावण्यात आली होती. पहिल्या टप्प्यानंतर आताही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने कठोर उपायोजना कायम ठेवण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यानंतरही शासन परिस्थिती पाहून योग्य ती भूमिका घेईल. या प्रतीक्षेवर वर- वधूंचा जीव अक्षरश: टांगणीला लागला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव केव्हा थांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विवाहासाठी मोठी बंधने टाकण्यात आली आहेत. २५ ते ५० व्यक्तींच्या वर मंडळी जमवता येत नाही. दरम्यान, ‘यंदा कर्तव्य आहे’ म्हणणाऱ्याची घोर निराशा झाली आहे. त्यातच गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याच्या प्रतीक्षेत वर-वधू आहेत. मात्र आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, हे सांगता येत नाही.
मागील महिन्यापर्यंत ज्यांची लग्ने होता होता राहिली, ती मोठ्या आशेने लग्नाची स्वप्न रंगवत आहेत. मात्र, त्यांची स्वप्ने कोरोनामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. आता मोठ्या स्वरूपात लग्न करणे कठीणच असल्याचे दिसत असल्याने, काही जण शासनाच्या नियमाच्या चौकटीत राहून थोडक्यात घरच्या घरी लग्न उरकून घेत असल्याचेही दिसून येत आहे. कोरोनामुळे हातावर मेंदी लावण्याचे स्वप्न पाहताना कोरोनाला दूर करण्यासाठी वर-वधूंच्या हातावर मेंदी लागण्याऐवजी सॅनिटायझर लावावे लागत आहे.