कोरोना कामात आरोग्य यंत्रणा व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 11:41 PM2021-05-08T23:41:10+5:302021-05-09T00:17:05+5:30
येवला : शहरातील उपजिल्हा रुग्णालयासह नगरसूल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व तालुक्यातील आरोग्य केंद्रांवरही सध्या कोरोना चाचण्या, लसीकरण केले जात असल्याने सर्वसामान्य रुग्णसेवा बंद केली गेली आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना कामात व्यस्त झाली आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. त्यापाठोपाठ या ठिकाणी कोरोना चाचणीही केली जात असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी असणाऱ्या इतर सर्व सुविधा बंद केल्या गेल्या आहेत.
अशीच अवस्था नगरसुल येथील ग्रामीण रुग्णालयाची आहे. तर ग्रामीण भागातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही सर्वसामान्यांना मिळणाऱ्या इतर सर्व वैद्यकीय सुविधा बंद आहेत. शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयातही कोरोना उपचार केले जात असल्याने सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे.
पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी याप्रश्नी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरद कातकडे यांच्या उपस्थितीत संबंधितांची बैैठक घेवून सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सर्वसामान्य रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा दिल्या जाव्यात तसेच रुग्णांना इतरत्र पाठवू नये, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत.