पंचशीलनगर : कोरोनामुक्त झालेल्या रूग्णाचा आरोग्य पथकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 04:56 PM2020-07-04T16:56:49+5:302020-07-04T16:59:52+5:30
या मारहाणीत एका पथकातील एका महिलेच्या मानेला जखम झाली आहे. या मारहाणी प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी डॉ. स्वाती सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
नाशिक : कोरोना संक्रमण काळात एखाद्या योद्धयाप्रमाणे आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी जनसामान्यांसाठी झटत आहे. अशाच एका 'कोरोना वॉरियर्स'च्या पथकावर जुने नाशिकमधील पंचशीलनगर भागात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जुन्या नाशकातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगर भागात घरोघरी सर्वेक्षण करण्यासाठी महिलांच्या एक पथकाने भेट दिली. यावेळी काही दिवसांपुर्वीच कोरोनामुक्त झालेल्या पंचशीलनगरमधील रहिवाशी संशयित सलीम तांबोळी यांच्या घरी पथकाने भेट दिली. त्यांच्यावर कोरोना आजारानंतर उपचार करण्यात आले आणि 'डिस्चार्ज' दिला गेला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची आईसुध्दा कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तांबोळी यांनी त्यांना "बाहेरून काय विचारता घरात येऊन तपासणी करा" असे सांगत उंबरठ्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या मारहाणीत एका पथकातील एका महिलेच्या मानेला जखम झाली आहे. या मारहाणी प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी डॉ. स्वाती सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रकाली पोलिसांकडून केला जात आहे.
शहरात एकूण १६८ महिलांचे आरोग्य पथक कार्यरत असून पथकावच हल्ला झाल्याने आरोग्यसेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना सारख्या महामारीत जीवाची पर्वा न करता या महिला आरोग्यसेविका 'कोरोना योद्धा' म्हणूनच काम करत आहे. मात्र अशा प्रकारे त्यांनाच काही लोकांकडून मारहाणीचा प्रयत्न होत असेल तर कोरोनाच्या संकटसमयी पुढे येणार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.