दहा बंदीवानांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:08+5:302021-04-13T04:14:08+5:30
नाशिकरोड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आठ दिवसांपूर्वी आलेल्या वीसपैकी दहा कच्च्या कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे ...
नाशिकरोड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आठ दिवसांपूर्वी आलेल्या वीसपैकी दहा कच्च्या कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.
वर्षभरापूर्वी देशात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने विशेष खबरदारी घेऊन योग्य नियोजन केल्याने अद्यापपर्यंत कारागृहामध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ शकला नाही.
कारागृहशेजारील के. एन. केला शाळेत नवीन आलेल्या कैद्यांना १४ दिवस ठेवल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून नंतरच कारागृहात सोडले जात होते. तीन महिन्यांपूर्वी कारागृह प्रशासनाने शाळेत सुरू केलेले तात्पुरते कारागृह बंद करून तेव्हापासून सर्व नवीन कैद्यांना कारागृहातच ठेवले जात आहे. कारागृहात नवीन आलेले कैदी अथवा न्यायालयीन कामकाजाकरिता नेण्यात आलेले कैदी यांना कारागृहात आणल्यानंतर स्वतंत्र बॅरिकेड्समध्ये १४ दिवस क्वारंटाईन ठेवले जात आहे.
न्यायालयात खटला सुरू असलेल्या कोपरगावच्या साठ कच्च्या कैद्यांना नगर, पुणे आणि नाशिकच्या कारागृहामध्ये दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले होते. नाशिकरोड कारागृहात आठ दिवसांपूर्वी वीस कैदी कोपरगाव येथून आले होते. त्यांची कारागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील दहा कैद्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.
त्यामुळे पॉझिटिव्ह आलेल्या १० कच्च्या कैद्यांना कारागृहात असलेल्या कोरोना कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर कारागृहातील डॉ. ससाणे यांनी उपचार केले. पॉझिटिव्ह असलेल्या दहा कच्च्या कैद्यांची प्रकृती सुधारत असल्याचे कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.
दरम्यान, कारागृहाचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय स्वतःच्या घरी राहतात. त्यांचे कुटुंबीय अत्यावश्यक कामासाठी बाजारात जातात. सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे बाहेर जाणारे कर्मचारी व कुटुंबीय कोरोनबाधित होऊ लागले आहेत. कर्मचारी आणि कैदी यांची कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी दररोज तापमान नोंद, कोरोना टेस्ट याप्रमाणे वैद्यकीय तपासणी केली जाते. कैद्यांना कोर्टात प्रत्यक्ष न नेता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले जात आहे. कैदी व नातेवाइकांच्या गाठीभेटी बंद करून फक्त फोनवर संवादाला परवानगी देण्यात आली आहे.