कोरोनाच्या संसर्गाने बाजार समिती धास्तावली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 06:48 PM2020-06-04T18:48:45+5:302020-06-04T18:50:12+5:30
बाजार समितीने मध्यंतरीच्या काळात खबरदारी म्हणून सलग तीन दिवस बाजार समितीतील व्यवहार बंद केले होते. मात्र त्यानंतर बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत झाले असले तरी नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही.
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपूर्वी व्यापारी व त्या पाठोपाठ एका हॉटेलचालकाला व आता एका संचालकालाच कोरोना विषाणूची लागण झाल्याने बाजार समितीतील अन्य घटक धास्तावले आहेत. बाजार समितीत होणारी गर्दी व सुरक्षित अंतर राखण्यात आलेले अपयश पाहता त्यातूनच कोरोनाला आमंत्रण मिळाल्याची भावना व्यक्त केली जात असून, योजलेल्या सर्व उपाययोजना अपयशी ठरल्या आहेत.
बाजार समितीने मध्यंतरीच्या काळात खबरदारी म्हणून सलग तीन दिवस बाजार समितीतील व्यवहार बंद केले होते. मात्र त्यानंतर बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत झाले असले तरी नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन शेकडो शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी आणत असतात. कोरोना विषाणूंचा संसर्ग सर्वत्र वाढत चालल्याने त्या पाशर््वभूमीवर बाजार समितीने पाहिजे तशी दखल अद्यापपर्यंत घेतलेली नाही, असा आरोप बाजार समितीतील व्यापारी व काही संचालकांनी केला आहे. दिंडोरीरोडला बाजार समिती मुख्य प्रवेशद्वाराजवळ संचालक मंडळांनी केवळ कोरोनापासून काय उपाययोजना करायची याची फलकबाजी करण्यातच धन्यता मानली असून, बाजार समितीत प्रवेश केल्यानंतर वाहनचालकांची स्क्रिनिंग केले जात असले तरी सॅनिटायझर कक्ष केवळ नावालाच उभारला असल्याचे व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले.
संपूर्ण जिल्ह्यासह नाशिक शहरातदेखील कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत चालल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतदेखील कोरोनाने शिरकाव केला असला तरी बाजार समिती प्रशासनाने पाहिजे ती दखल घेतली नसल्या कारणामुळे आगामी कालावधीत बाजार समितीत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढून रुग्णसंख्येत भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.