'कोरोना' संसर्गजन्य आजार; काळजी घेण्याची गरज: डॉ नितीन रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 07:41 PM2020-02-08T19:41:50+5:302020-02-08T19:45:41+5:30
महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन रावते रावते यांनी दिली. रोग कोणताही असो मात्र त्याबाबत दक्षता घेऊन वेळीच उपचार केले पाहिजेत असेही त्यांनी लोकमतशी संवाद साधताना सांगितले.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जगात कोरोना या नव्या आजाराविषयी चिंता व्यक्त केली जात असली तरी भारतात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही मात्र यासंदर्भात शासनाने दक्षता घेण्यास प्रारंभ केला आहे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन रावते रावते यांनी दिली. रोग कोणताही असो मात्र त्याबाबत दक्षता घेऊन वेळीच उपचार केले पाहिजेत असेही त्यांनी लोकमतशी संवाद साधताना सांगितले.
प्रश्न - सध्या देशभरात चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोना या रोगाची सद्यस्थिती काय आहे
उत्तर- सध्या कोरोना या आजाराची देशभर नव्हे तर जगभरात चर्चा सुरू आहे. या आजाराचा प्रसार आज जगातील 14 देशांमध्ये झाला आहे. भारतामध्ये तशी स्थिती राज्यात निर्माण झालेली नाही मात्र, सरकारच्यावतीने यासंदर्भात काळजी घेतली जात आहे विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. त्यानंतरच त्यांना देशात प्रवेश दिला जात आहे. संशयास्पद रुग्णांना विलगीकरण (स्वतंत्र) कक्षात तपासणीसाठी दाखल करण्यात येते आहे. त्यामुळे भारतात गंभीर परिस्थिती नाही.
प्रश्न- महाराष्ट्रात या संदर्भात काय काळजी घेतली जात आहे?
उत्तर - केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेल्या आदेशानुसार या संसर्गजन्य आजाराबाबत दक्षता घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. राज्यात ठिकाणी वैद्यकीय व्यवसायिकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये सुद्धा या संदर्भात इंडियन इंडियन मेडिकल असोसिएशन च्या मदतीने कार्यशाळा घेण्यात आली. या रोगाची लक्षणे आढळल्यास त्या रुग्णाचे स्वॅप घेऊन ते तपासणीसाठी मुंबई येथे शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रश्न - या रोगाची लक्षणे काय आहेत आणि त्याचे गांभीर्य काय आहे?
उत्तर- साधारणत: स्वाईन फ्ल्यू प्रमाणेच या रोगाची लक्षणे आहेत. सर्दी खोकला आणि अचानक ताप येणे यातून निमोनिया होणे हे या रोगाचे लक्षण आहे. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे नाशिकमध्येच नव्हे तर राज्यस्तरावर अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात काळजी घेण्यात येत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनीही या संदर्भात दक्षता घेण्याची गरज आहे.
प्रश्न- महापालिका या संदर्भात काय काळजी घेत आहे.
उत्तर- शासनाच्या आदेशाप्रमाणे आरोग्य उपसंचालकांनी बैठक घेऊन शासकीय यंत्रणांना कार्यवाही करण्यास सांगितले आहे त्यामुळे नाशिक महापालिकेच्या वतीने आता जनप्रबोधनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी दक्षता घेऊन योग्यवेळी वैद्यकिय सल्ला घेतल्यास अडचण होणार नाही.