नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ६ टक्क्यांवर
By श्याम बागुल | Published: June 2, 2020 05:08 PM2020-06-02T17:08:29+5:302020-06-02T17:10:43+5:30
नाशिक जिल्ह्यात आजवर १२३६ कोरोनाबाधित आढळून आले असून, सर्वाधिक रुग्ण मालेगाव शहरात ७७९ इतके, तर नाशिक महापालिका हद्दीत २१८ व नाशिक ग्रामीण भागात १७९ रुग्ण आजवर कोरोनाने पीडित सापडले.
श्याम बागुल
नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्यातूनच उपचाराअंति बाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात कोरोनाने ७३ बळी घेतल्याने एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचा दर ६ टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. देशातील एकूण मृत्यूच्या टक्केवारीपेक्षा हे प्रमाण काहीसे अधिक असले तरी, कोरोनामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ६८ टक्क्यांच्या आसपास दिलासादायक आहे. कोरोनाने आबालवृद्धांना आपला विळखा घातला असला तरी, वयाच्या चाळिशीनंतरच्या रुग्णांचा यात सर्वाधिक बळी घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यात आजवर १२३६ कोरोनाबाधित आढळून आले असून, सर्वाधिक रुग्ण मालेगाव शहरात ७७९ इतके, तर नाशिक महापालिका हद्दीत २१८ व नाशिक ग्रामीण भागात १७९ रुग्ण आजवर कोरोनाने पीडित सापडले. आरोग्य विभागाने अशा रुग्णांना बरे करण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अशा उपचाराअंति बºया झालेल्या रुग्णांची संख्या ८४६ इतकी असून, त्याचे प्रमाण ६८ टक्के इतके आहे. बरे होणाºया रुग्णांमध्ये मालेगाव महापालिका व नाशिक ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात आजवर ७३ कोरोनाबाधित रुग्ण मयत झाले असून, त्यात सर्वाधिक ५५ रुग्ण मालेगाव शहरातील आहेत. त्या खालोखाल नाशिक शहरात नऊ, ग्रामीण भागात पाच रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाहता एकूण रुग्णांच्या तुलनेत त्याचे प्रमाण ५.९१ टक्के इतके असून, त्यातही मालेगावचा दर ७ टक्के, नाशिक शहरात ४ टक्के, तर ग्रामीणचे प्रमाण दोन टक्के इतकेच आहे. मृत्यू होणाºयांमध्ये वय १३ ते २५ वयोगटांत तिघे, २६ ते ४० वयोगटांत सहा व ४१ ते ६० वयोगटांत सर्वाधिक म्हणजे ४४ मृत्यू झाले आहे. एरव्ही कोरोना लहान बालके व वयोवृद्धांना लवकर बाधित करतो असे मानले जात असताना ६० वयोगटाच्या पुढे असलेल्या फक्त २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधित १०३ रुग्ण उपचार घेत असले तरी, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या ३१७ इतकी आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५४५ इतकी आहे. या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क व लो रिस्कच्या व्यक्तींची आरोग्य तपासणीची मोहीम सुरूच असून, आजवर चार लाख, ६७ हजार ४८६ इतक्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.