कोरोना बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:16 AM2021-05-25T04:16:04+5:302021-05-25T04:16:04+5:30
नियमांचे उल्लंघन जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य आस्थापना सुरू पंचवटी : नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ...
नियमांचे उल्लंघन
जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य आस्थापना सुरू
पंचवटी : नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तब्बल बारा दिवस कठोर निर्बंध लादत कडक लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र बारा दिवसांच्या कालावधीनंतर प्रशासनाने नियम शिथिल करताच नागरिकांना कोरोनाचा विसर पडला आणि नागरिक बिनधास्तपणे घराबाहेर पडले. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडविले गेले. विशेष म्हणजे एवढे दिवस कारवाई करणारे पालिका व पोलीस प्रशासन रस्त्यावर दिसून न आल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ म्हणण्याची वेळ प्रशासन व नागरिकांवर आली.
तसेच जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य आस्थापना देखील सुरू केल्याने लॉकडाऊन संपल्याचा आभास पंचवटी परिसरात निर्माण झाला होता.
सोमवारपासून प्रशासनाने कोरोना नियम शिथिल केल्याने नागरिकांनी सकाळपासून घराबाहेर पडणे सुरू केले होते. कोण भाजीपाला, तर कोण किराणा खरेदीसाठी घराबाहेर पडत होते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी काहींनी गर्दी केली होती. तसेच अनेक युवक लॉकडाऊन संपल्याचा आनंद घेण्यासाठी रस्त्यावर दुचाकी फिरवून घिरट्या घालत होते.
जीवनावश्यक वस्तूत मोडणारी दुकाने सुरू होती. मात्र त्यात आणखी भर म्हणून कुठे वाहन दुरुस्ती केंद्र, तर कुठे इस्त्रीची, सलून, हार्डवेअरची दुकाने सुरू होती. अनेकांनी लॉकडाऊन संपला असे गृहित धरून सोमवारी दुकानांच्या साफसफाईचे काम हाती घेतले होते.
बारा दिवस निर्बंध लादत प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर फिरण्यास मनाई केली होती. आवश्यक गरजेनुसारच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे सूचित केले होते. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली होती, तर मनपा प्रशासनाने देखील अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केलेली होती. परंतु सोमवारी कोरोना नियम शिथिल केल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले खरे, मात्र त्यांना टोकणारे पोलीस व महापालिका प्रशासन पथक गायब असल्याने लॉकडाऊन संपला, असे गृहित धरून नागरिकांना एकप्रकारे मोकळीकच मिळाली.
सोमवारी रस्त्यावर दुचाकी, चारचाकी, रिक्षा यांसह खासगी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उतरल्याने पंचवटीतील सर्व मुख्य रस्ते तसेच गल्ली-बोळातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ दिसून आली. रस्त्यावर दुतर्फा उभ्या राहणाऱ्या हातगाड्या तसेच भाजीपाला खरेदीसाठी महिलांनी देखील मोठी गर्दी केल्याने, नियम शिथिल करताच पहिल्याच दिवशी पंचवटीत फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला.