कोरोना आता मनपाच्या दारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:45 PM2020-05-12T22:45:05+5:302020-05-12T23:30:14+5:30
नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले असले तरी मंगळवारी (दि.१२) महापालिकेच्या कंत्राटी सुरक्षारक्षकासच लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले असले तरी मंगळवारी (दि.१२) महापालिकेच्या कंत्राटी सुरक्षारक्षकासच लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर उपचार सुरू करण्यात आले असून, काठेगल्ली हा त्याच्या राहण्याचा परिसर सील करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत. दरम्यान, आता महापालिकेकडे काम करणारा हा पहिलाच कोरोनाबाधित कर्मचारी आहे.
महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या विरोधात वैद्यकीय विभागाचे कर्मचारी लढा देत आहेत. कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय सध्या कोरोनासाठी विशेष रुग्णालय म्हणून स्थापित करण्यात आले आहे. याठिकाणी उपचार करण्यात येते. महापालिकेच्या वतीने याठिकाणी कार्यरत सर्वच आरोग्यसेवक आणि अन्य कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. यावेळी याच रुग्णालयात असलेल्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी (दि.१२) स्पष्ट झाले. त्याचा घसा स्राव नमुना १० मे रोजी घेण्यात आला होता. मंगळवारी त्याचा अहवाल मिळाला. विशेष म्हणजे या रक्षकास कोणत्याही प्रकारच्या आजाराची लक्षणे नव्हती. तसेच त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री किंवा अन्य काही नसल्याने त्याला लागण झाल्याने महापालिकेचा वैद्यकीय विभागदेखील कारणांचा शोध घेत आहे. सदर रुग्ण राहात असलेल्या काठे गल्ली भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
नाशिक शहरात आत्तापर्यंत ३९ रुग्ण आढळले होते. यातील
काही बाहेरून आलेले नागरिक होते, तर त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग झाल्याचे आढळले होते. मात्र, आता थेट व्यवस्थेतील एकाला बाधा झाल्याने कर्मचारी काहीसे धास्तावले आहेत.
---
२८ क्षेत्र प्रतिबंधात्मक
महापालिका क्षेत्रात आढळलेल्या या रुग्णामुळे आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या चाळीस झाली आहे. आत्तापर्यंत २८ प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. नाशिक शहरातील संख्या मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र रुग्ण संख्या वाढतच असून, ती शहरवासीयांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.