कोरोनामुळे तमाशातील अप्सरांच्या माथी उपेक्षाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:13 PM2020-04-18T21:13:58+5:302020-04-19T00:38:43+5:30
मनमाड : सध्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू असून, या कालावधीत ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते, मात्र यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात यात्राच भरल्या नाही. परिणामी सर्वत्र तमाशाचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गिरीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : सध्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू असून, या कालावधीत ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते, मात्र यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात यात्राच भरल्या नाही. परिणामी सर्वत्र तमाशाचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तमाशातील लावणी नाट्यगृहात आली म्हणून तमासगिरांचे दिवस बदलले नाही. आजही हे कलावंत आभाळाच्या तंबूखाली संसार मांडून तमाशा ही कला जिवंत ठेवत आहे. लावणीचे कार्यक्रम नाट्यगृहात सुरू झाले, मात्र पारंपरिक तमाशा करणाऱ्यांच्या नशिबाच्या दुर्दैवाचे दशावतार काही संपले नाही. चैत्र महिन्यात गावागोवी यात्रा जत्रांचा हंगाम सुरूअसतो. अनेक ठिकाणी हे कलावंत आपली कला सादर करण्यासाठी गावोगावच्या सुपारीची वाट पाहतात. एप्रिल व मे अशा दोन महिन्यांत साधारण ४७ ते ४८ यात्रांच्या तिथी येतात. यावर्षी कोरोनामुळे अनेक गावांमधे यात्रा भरल्याच नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत खर्च वाढला असला तरी व्यवसाय नसल्याने अगदी अल्प मानधनाच्या सुपारीवर कलाकार कार्यक्रम करण्यास तयार असले तरी त्यांना काम मिळू शकले नाही. ग्रामीण भागातील यात्रा, जत्रा रद्द करण्यात आल्याने ज्यांनी अर्धपोटी राहून प्रसंगी उपाशी राहून ही कला जागविली त्यांच्या नशिबी घोर उपेक्षा आली आहे.
---------------
आमच्या सोपान कोळी लोकनाट्य तमाशा मंडळाचा शेवटचा कार्यक्रम १२ मार्चला सायगाव येथे झाला होता. त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील यात्रा रद्द झाल्याने तमाशा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटामधे कलाकारांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा.
- सोपान कोळी दोनगावकर,
तमाशा कलावंत
----------------
कोरोनाच्या संकटामुळे तमाशाचे कार्यक्रम रद्द झाले आहे. वर्षभरातील सुगीचा काळ म्हणून ओळखल्या जाणाºया यात्रांच्या हंगामामध्येच तमाशा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कठीणप्रसंगी फडातील कलाकारांना धान्य व किराणा वाटप करण्यात आले. या संकटातून देश वाचविण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे
- राणी पाटील पैठणकर, तमाशा कलावंत