अध्यापनाबरोबर कोरोना जनजागृती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:50 PM2020-09-04T22:50:45+5:302020-09-05T01:05:26+5:30
कोविड-१९मुळे मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद असल्याने जूनपासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षात पेठ तालुक्यातील शिक्षक गावागावात मुलांना अध्यापन करण्याबरोबर ग्रामस्थांमध्येही कोरोनाबाबत जनजागृतीचे काम करत आहेत.
पेठ : कोविड-१९मुळे मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद असल्याने जूनपासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षात पेठ तालुक्यातील शिक्षक गावागावात मुलांना अध्यापन करण्याबरोबर ग्रामस्थांमध्येही कोरोनाबाबत जनजागृतीचे काम करत आहेत.
पेठ हा दुर्गम तालुका असल्याने शिवाय पालकांची आर्थिक परिस्थिती, नेटवर्कचा अभाव यामुळे शासन निणर्यानुसार आॅनलाइन अध्यापन करणे शक्य नसल्याने शिक्षक स्वत: ठरवून दिलेल्या वेळात गावात, वाडीवस्तीवर जाऊन मुलांना घरी अध्यापन करत आहेत. शिवाय गावातील नागरिकांना कोरोना या विषाणूबाबत माहिती, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, शासकीय नियमांचे पालन व घ्यावयाची काळजी या संदर्भात जनजागृती करताना दिसून येत आहेत. कोरोनाकाळात शासकीय कर्तव्यासोबत जनजागृती करण्याचे सामाजिक व राष्टÑीय कार्यातही शिक्षकांनी योगदान दिले असून, विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, शैक्षणिक साहित्य वाटप केले जात आहे.
सध्या शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आश्रमशाळेतील शिक्षकांनी नियोजन करून मुलांच्या गावात जाऊन वैयक्तिक अध्यापन सुरू केले असून, कोरोना विषाणूची भीती दूर होऊन नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी यासाठी मुलांबरोबर गावातील महिलांना मार्गदर्शन केले जात आहे.
- रोहिणी कणसे पाटील, शिक्षिका