कोरोना, पावसाळी नाल्यांवरून महासभेत प्रशासन धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 09:32 PM2020-06-18T21:32:36+5:302020-06-18T21:37:26+5:30
जुन्या नाशकात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना या भागातील बंद असलेले मुलतानपुरा रुग्णालय तसेच, नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात नागरिकांच्या घरात शिरलेले पाणी यावरून नगरसेवकांनी प्रशासनला धारेवर धरले.
नाशिक : जुन्या नाशकात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना या भागातील बंद असलेले मुलतानपुरा रुग्णालय तसेच, नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात नागरिकांच्या घरात शिरलेले पाणी यावरून नगरसेवकांनी प्रशासनला धारेवर धरले. गुरुवारी (दि.१८) झालेल्या महासभेत यावर चर्चा झाल्यानंतर पावसाळी गटारींची कामे झाले नसल्याने महापौरांनीच नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शहरातील वृक्ष गणनेसाठी आलेल्या वाढीव खर्चाबाबत नगरसेवकांनी संशय व्यक्त केल्याने हा प्रस्ताव रोखण्यात आला, मात्र अशाच प्रकारे पाच वर्षांपूर्वी कुंभमेळ्यात झालेल्या कामांच्या सुमारे १७ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेची महासभा सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडत असताना ऐनवेळी कोरोनाबाबत काही प्रमाणात चर्चा झाली. जुने नाशिक भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना गेल्या अनेक वर्षांपासूनचे मुलतान पुरा रुग्णालय बंद पडून आहे, त्याचा उपयोग होत नसल्याने समिना मेमन आणि अन्य काही नगरसेवकांनी जाब विचारला. यावेळी मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने रुग्णालय अशावेळीदेखील सुरू होत नसल्याचा धक्कादायक खुलासा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी केला. येथील जेएमसीटी कॉलेजचा एक मजलादेखील महापालिकेने पर्यांयी जागा म्हणून घेतला परंतु रुग्णालय का सुरू होत नाही, असा प्रश्न नगरसेवकांनी केला. पावसाळ्यात शहरात गंभीर स्थिती निर्माण झाली. सराफबाजार, मेनरोडसह अन्य भागांत पाणी साचत असल्याची तक्रार करण्यात आली. हेमलता कांडेकर यांनी शिवाजीनगर भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याची तक्रार केली, तर विलास शिंदे आणि संतोष गायकवाड यांनी गंगापूररोडवरील नवश्या गणपती आणि अन्य भागांत पाण्याचे तळे साचल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाले बुजवण्याच्या प्रकाराच्या विरोधात तक्रारी करूनदेखील काहीच उपयोग झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला, तर महापौर सतीश कुलकर्णी यांनी नालेसफाई झालीच नसल्याने शहरात सर्वत्र पाणी साचले त्यामुळे शहर अभियंत्यांनी घटनास्थळी जाऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.