चैत्रोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 02:00 AM2021-04-14T02:00:06+5:302021-04-14T02:01:58+5:30

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद केल्याने साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धेपीठ असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर दि. २१ ते २७ एप्रिल दरम्यान होणारा चैत्राेत्सवही रद्द होण्याची शक्यता आहे.  सलग दुसऱ्या वर्षीही चैत्रोत्सवावर कोरोनाचे सावट कायम असून  ट्रस्टने अद्याप यात्रोत्सवाबाबत अधिकृतपणे कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Corona savat on Chaitrotsava again | चैत्रोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट

चैत्रोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट

Next
ठळक मुद्देदेवस्थान बंद : यंदाही परंपरा खंडित होण्याची शक्यता

कळवण : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद केल्याने साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धेपीठ असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर दि. २१ ते २७ एप्रिल दरम्यान होणारा चैत्राेत्सवही रद्द होण्याची शक्यता आहे.  सलग दुसऱ्या वर्षीही चैत्रोत्सवावर कोरोनाचे सावट कायम असून  ट्रस्टने अद्याप यात्रोत्सवाबाबत अधिकृतपणे कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु, येत्या दोन-तीन दिवसांत यासंदर्भात बैठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देवस्थानने दिली आहे. 
चैत्रोत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याने  यात्रेवर अवलंबून असलेल्या ग्रामस्थ, व्यावसायिक व  व्यापाऱ्यांनी धसका घेतला आहे.  सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, व्यापारी, व्यावसायिक, फ्युनिक्युलर ट्रॉली परिवहन मंडळ, खासगी वाहतूक आदी सर्व व्यवसायाला सलग दुसऱ्या वर्षी आर्थिक फटका बसणार असल्यामुळे यंदाही कोट्यवधींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे.  आदिमाया सप्तशृंगीचा वर्षभरातील वेगवेगळ्या उत्सवांपैकी एक प्रमुख उत्सव असलेला चैत्रोत्सव २१ ते २७ एप्रिल दरम्यान होत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा उत्सवही रद्द होण्याच्या मार्गावर आहे.  मागील वर्षी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून प्रशासनाने ११  मार्चपासून मंदिरे दर्शनासाठी बंद केल्याने तेव्हाही चैत्रोत्सव रद्द केला होता. दरवर्षी चैत्रोत्सवासाठी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व इतर राज्यांतून सुमारे दहा लाखांवर भाविक हजेरी लावतात. यात खानदेशातून तीन ते चार लाख भाविक पदयात्रेने येण्याची परंपरा होती. ती कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही खंडित  होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
दरम्यान, देवस्थान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मंदिरे बंदच असून चैत्रोत्सवाबाबत ट्रस्टची बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
ऑनलाइन दर्शनाची  भाविकांसाठी सुविधा
मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी आदिमायेची नित्य दैनंदिन पूजाविधी सुरू असून, देवीचे घरबसल्या दर्शन व्हावे  यासाठी लाइव्ह ऑनलाईन दर्शन सुविधा ट्रस्टच्या वेबसाईट व सोशल मीडियाच्या माध्यमातून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने अगोदरपासूनच उपलब्ध करून दिली आहे. तसेच व्हॉट्सॲप , फेसबुकद्वारे आदिमायेच्या मूर्तीचा दररोजचा फोटो नियमित प्रसारित करण्यात येत आहे.  राज्यातील व जिल्ह्यातील वाढती कोविड संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन भाविकांनी स्वतःच्या व कुटुंबीयांच्या सुरक्षितेसाठी घरात बसूनच आदिमायेचे दर्शन घेण्याचे आवाहन सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Web Title: Corona savat on Chaitrotsava again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.