गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:42 PM2020-03-24T22:42:58+5:302020-03-25T00:17:59+5:30
यंदाच्या हिंदू नववर्षावर अर्थात गुढीपाडव्यावर प्रथमच महामारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याच्या उत्साहावर कोरोनाचे सावट पसरले आहे. अर्थात तरीदेखील घरोघरी गुढीपाडवा साजरा केला जाणार असून, कौटुंबिक आरोग्यासह सामाजिक आरोग्यदेखील सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने घरातच राहून जमेल तसा हा सण साजरा करणेच समाजहिताचे ठरणार आहे. तेव्हाच यंदाची गुढी ही कोरोनावरील विजय मिळवणारी विजयपताका ठरेल.
नाशिक : यंदाच्या हिंदू नववर्षावर अर्थात गुढीपाडव्यावर प्रथमच महामारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याच्या उत्साहावर कोरोनाचे सावट पसरले आहे. अर्थात तरीदेखील घरोघरी गुढीपाडवा साजरा केला जाणार असून, कौटुंबिक आरोग्यासह सामाजिक आरोग्यदेखील सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने घरातच राहून जमेल तसा हा सण साजरा करणेच समाजहिताचे ठरणार आहे. तेव्हाच यंदाची गुढी ही कोरोनावरील विजय मिळवणारी विजयपताका ठरेल.
भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा या नववर्षाच्या स्वागत सणाचे महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवसाला भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळविण्याचा प्रातिनिधिक दिन मानले जाते. त्यानुसार घराबाहेर गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत देवदर्शन करून करण्यात येते. मात्र, यंदा प्रथमच काळाराम किंवा भद्रकाली देवी या ग्रामदैवतांच्या दर्शनाविना भाविकांना नूतन संवत्सरास प्रारंभ करावा लागणार आहे. ही गुढी स्नेहाची, मांगल्याची आणि आनंदाची प्रतीक मानली जाते. प्रत्येक नववर्ष हे आपल्यासह कुटुंबाला भरभराटीचे जावो, हाच संकल्प असतो. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस मानला जातो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर स्टीलचा, तांबे, पितळेचा तांब्या बसवून गुढी साकारली जाते. येत्या आठवडाभरात नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगून कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दिशेने खबरदारी घेतली जाणे अत्यावश्यक आहे. यंदा सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली असून, मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शनाची मुभा नाही. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबून एकमेकांना शुभेच्छा संदेश देत गुढीपाडवा साजरा करणेच समाजाच्या हिताचे ठरणार आहे.
गुढी उभारणीसाठीचे मुहूर्त
गुढी उभारणीसाठी बुधवारी सकाळी ६.३० ते ८ यादरम्यान लाभ मुहूर्त तर ८ ते ९.३० दरम्यान अमृत मुहूर्त आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १२.१५ या वेळेत शुभ मुहूर्त आहे. मात्र परंपरेनुसार सकाळच्या वेळेत गुढी उभारून घ्यावी. - प्रदीप बोरकर, गुरुजी