नाशिकरोडमधील झोपडपट्ट्यांना कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 06:26 PM2020-07-18T18:26:38+5:302020-07-18T18:28:21+5:30

नाशिकरोड परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या वाड्या, नगरे आणि झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, प्रशासनाचीदेखील धावपळ वाढली आहे.

Corona to the slums in Nashik Road | नाशिकरोडमधील झोपडपट्ट्यांना कोरोनाचा विळखा

नाशिकरोडमधील झोपडपट्ट्यांना कोरोनाचा विळखा

Next
ठळक मुद्देधोका अधिक अंतर्गत रस्ते बॅरिकेड्सने बंद

नाशिक : नाशिकरोड परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या वाड्या, नगरे आणि झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, प्रशासनाचीदेखील धावपळ वाढली आहे.
महापालिका हद्दीत कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे, तर महापालिका प्रशासनाकडून संबंधित परिसरात उपायोजना केल्या जात आहेत. गावठाण आणि लहान-मोठ्या वसाहतींचा हा परिसर काही ठिकाणी अत्यंत दाट लोकवस्तीचा आहे. अशा ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गुलाबवाडी, देवळालीगाव, राजवाडा, विहितगाव, गोसावीवाडी, रोकडोबावाडी तसेच गोरेवाडीसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये काहीशी भीती आहे.
नाशिकरोडच्या चारही बाजूंना झोपडपट्टी, छोटे-मोठे नगरे आणि जुना गावठाण परिसर आहे. वाढत्या वसाहती आणि वाहतुकीमुळे नाशिकरोडमधील वर्दळ वाढलेली दिसते. गेल्या काही दिवसांत गर्दीच्या या परिसरामध्ये कोरोनाने शिरकाव केला असून, नाशिकरोडमधील झोपडपट्टी परिसरात सातत्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसते. याचा सर्वाधिक धोका हा कुटुंबांना अधिक बसला आहे. एखाद्या कुटुंबात रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण कुटुंब बाधित होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे, तर काही ठिकाणी मुंबई, पुण्याहून आलेल्या नातेवाइकांमुळेदेखील काहींना कोरोनाची बाधा झालेली आहे. बाहेरील व्यक्तीच्या संसर्गातील संपूर्ण माहिती अद्यापही समोर आलेली नससल्याने त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याचे बोलले जात आहे.
गोसावीवाडी ही अत्यंत दाट लोकवस्तीची झोपडपट्टी असून, मुख्य रस्त्यालगत असल्याने या परिसरात नेहमीच वर्दळ असते. गुलाबवाडी झोपडपट्टी ही मालधक्क्याजवळ असून, अनेक ट्रकचालक या ठिकाणी राहतात. येथील अनेक लोक रोजंदारीची तर महिला धुणी-भांड्यांची कामे करतात. बांधकाम, मार्केट कमिटी, भाजीपाला व्यवसाय, हमाली, पेट्रोलपंप अशी कामे कमी अधिक प्रमाणात येथील नागरिक करीत असल्यामुळे ते अधिक अनेकांच्या संपर्कात येतात. शिवाय दाट लोकवस्ती असल्यामुळे त्यांचाही इतरांना संसर्ग होतो. विशेषत: छोटी घरे असल्याने कुटुंबातील अन्य सदस्यांना लागलीच लागण होते. कोरोनाच्या या विळख्यातून नागरिकांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहेच शिवाय नागरिकांनादेखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Corona to the slums in Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.