कोरोनाने थांबली गृहनिर्माण क्षेत्राची गती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:37+5:302021-06-09T04:16:37+5:30
गिरीश जोशी, मनमाड : सध्या अनेक अडचणींचा सामना करत सुरू असलेला बांधकाम व्यवसाय गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ...
गिरीश जोशी, मनमाड : सध्या अनेक अडचणींचा सामना करत सुरू असलेला बांधकाम व्यवसाय गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र विळखा घातलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे चांगलाच संकटात सापडला आहे. हळूहळू निर्बंध शिथिल होऊन जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी लॉकडाऊनच्या भीतीने बांधकाम मजूर आपापल्या गावी गेल्याने गृहप्रकल्पाची गती थांबली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव बांधकाम व्यवसायाच्या मुळावर उठला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
मनमाड शहरात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मजूर कामावर परतल्याने सर्व प्रकारच्या बांधकामांना वेग आला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. गेल्यावर्षीचा अनुभव पाहता कडक लॉकडाऊन व सीमा सील करण्याच्या भीतीने परप्रांतीय कारागीर व मजुरांनी आधीच पलायन करायला सुरवात केली. गेल्यावर्षी अनेक मजुरांना हजारो मैल पायी चालत घर गाठावे लागले होते. तो कटू अनुभव पाठीशी असल्याने मजुरांनी वेळीच घर गाठणे पसंत केले. काही बांधकाम प्रकल्पांवर निवासी असलेले कारागीर व कामगार स्वगृही न जाता काम करत असले तरी अशी संख्या फार कमी आहे. या ठिकाणी बांधकाम करणारे मजूर, कारागीर, बांधकाम व्यावसायिक यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागत आहे. मजुरांअभावी अनेक नवीन इमारतींची बांधकामे, इमारत दुरुस्तीची कामे व त्या संबंधित सर्व कामे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
--------------------
व्यवसाय संकटात
गेल्यावर्षी शहरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे सध्या बऱ्यापैकी बांधकामे सुरू होती. त्यातच आता कोरोनामुळे बांधकामे बंद असल्याने बांधकाम व्यवसाय संकटात सापडला आहे. याबरोबरच बांधकाम व्यवसायाला पूरक असलेले वाळू, खडी, सिमेंट, फर्निचर, लोखंड, वाहतूक करणारे रिक्षा, टेम्पो, मालक-चालकांच्या कामालाही कोरोनाचा फटका बसला आहे.
-----------------
बहुतांश बांधकाम प्रकल्पांवर परप्रांतीय बांधकाम कारागीर व मजूर म्हणून काम करतात. बांधकाम, सुतारकाम, सेंट्रिंग काम, प्लंबिंग, फरशी फिटिंग, पीओपी यासारख्या कामांवर परप्रांतीय कारागिरांना मागणी अधिक असते. कमी वेळात दर्जेदार काम करण्याच्या पध्दतीमुळे या कारागिरांना बांधकामांच्या प्रकल्पांवर प्राधान्य देण्यात येते. (०७ मनमाड)
------------------------
परप्रांतीय मजूर आपापल्या गावी गेल्याने अनेक बांधकामे ठप्प झाली आहेत. आता सर्व पूर्वपदावर येत असले तरी बांधकाम क्षेत्राला खऱ्या अर्थाने गती येण्यासाठी स्किल्ड कारागीर व मजुरांची प्रतीक्षा आहे.
- पराग बा. पाठक, बांधकाम व्यावसायिक (०७ पराग पाठक)
===Photopath===
070621\07nsk_29_07062021_13.jpg
===Caption===
०७ मनमाड ०७ पराग पाठक