नाशिकमध्ये आढळला दुबई, ब्रिटनमधील कोरोना स्ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:14 AM2021-03-19T04:14:53+5:302021-03-19T04:14:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोना संसर्ग हळूहळू आटोक्यात येत असताना ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन नाशिकमध्येही आढळून आल्याने ...

Corona strain found in Dubai, UK in Nashik | नाशिकमध्ये आढळला दुबई, ब्रिटनमधील कोरोना स्ट्रेन

नाशिकमध्ये आढळला दुबई, ब्रिटनमधील कोरोना स्ट्रेन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : कोरोना संसर्ग हळूहळू आटोक्यात येत असताना ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन नाशिकमध्येही आढळून आल्याने संपूर्ण यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. ब्रिटनबरोबरच दुबईसह अन्य तीन देशांमध्ये आढळणारे स्ट्रेन्स नाशिकमधील रूग्णांमध्ये आढळल्याने चिंता वाढली आहे. हा नवीन विषाणू काेरोनापेक्षा अधिक वेगाने फैलावणारा आणि शरिरावर व्यापक परिणाम करणारा असल्याचे सांगितले जाते.

जिल्ह्यातील रूग्णवाढीचा वेग लक्षात घेता, प्रशाससाने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेकडे पाठवलेल्या २६ नमुन्यांपैकी ३० टक्के नमुन्यांमध्ये दुबई आणि ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने चिंता वाढली आहे. कोरोना विषाणूचा हा नवा स्ट्रेन झपाट्याने पसरत असून, त्यामध्ये रूग्णवाढीचा वेग अधिक आहे. यामध्ये जीविताचा धोका कमी असला, तरी विषाणू पसरण्याचा धोका चारपट अधिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने निर्बंधाचे पालन करून स्वत:ची आणि इतरांचीदेखील काळजी घेतली पाहिजे. यासाठी आता निर्बंधांचे पालन करण्यासाठी जिल्ह्यात अधिक कठोर कारवाई करण्याची सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यंत्रणेला केली आहे.

दुबई आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेननंतर त्या देशांमध्ये राष्ट्रीय लॉकडाऊन करण्याची वेळ आली होती. त्यानंतरही कोरोना पसरण्याचा वेग वाढतच गेल्याने या देशांवर मोठे संकट उभे राहिले होते. मोठ्या प्रयत्नानंतर त्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळाले आहे. मात्र, धोका अजूनही कायम आहे. गतवर्षी जिल्ह्यात कोरोना पसरल्यानंतर ब्रिटनमधून विषाणूचा नवा स्ट्रेन नाशिकमध्ये आला की काय, अशी शंका निर्माण झाल्याने तेव्हाही त्याबाबतची तपासणी करण्यात आली होती. सुदैवाने त्यावेळी नाशिकमध्ये अशाप्रकारचा विषाणू आढळला नव्हता. परंतु, यावेळी केलेल्या तपासणीत युरोपियन स्ट्रेन असल्याचे निष्पन्न झाल्याने नाशिकमध्ये रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

जिल्ह्यात सध्या १० हजार ८५१ इतके ॲक्टिव्ह रूग्ण असून, त्यापैकी ८० टक्के रूग्ण हे महापालिका क्षेत्रात आहेत तर १८ टक्के रूग्ण ग्रामीण भागात आहेत. मालेगावमध्येही ७१६ इतके ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. कोरोना रूग्णांच्या माध्यमातून संसर्ग पसरू नये यासाठी ९० टक्के रूग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात ३ मार्चपासून रूग्णसंख्या वाढीचा वेग सुरू झाला. त्यानंतर सातत्याने रूग्णांची संख्या वाढतच आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकाच दिवशी दोन हजारपर्यंत रूग्ण आढळल्याने झपाट्याने पसरणाऱ्या कोराेनाविषयीची चिंता वाढली आहे.

--कोट--

जिल्ह्यातील रूग्णवाढीचा वेग पाहता, पूर्वीप्रमाणेच संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. कोविड सेंटर्स, व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन याबरोबरच बेडस‌् उपलब्ध होण्यासाठी तयारी करून ठेवण्याची आवश्यकता आहे. काेरोनाचा नवा स्ट्रेन शरिरावर विपरीत परिणाम करणारा असल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने निर्बंधांचे पालन करणे अपेक्षित आहे.

- छगन भुजबळ, पालकमंत्री.

Web Title: Corona strain found in Dubai, UK in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.