कोरोना संशयित वृद्धाचा पाय घसरून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:30 PM2020-04-13T23:30:42+5:302020-04-13T23:32:59+5:30
नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेला कोरोना संशयित ८० वर्षीय वृद्ध कक्षातील बाथरूममध्ये पाय ...
नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेला कोरोना संशयित ८० वर्षीय वृद्ध कक्षातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही वृद्ध व्यक्ती शनिवारी (दि. ११) दाखल झाली होती.
मयत झालेला ८० वर्षीय वृद्ध हा नगर जिल्ह्यातील अकोले कोठुळे येथील रहिवासी होता. त्यांना मधुमेह, हृदयाचाही त्रास होता. त्यामुळे ते नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेल्या शनिवारी (दि. ११) दाखल करण्यात आले होते. तपासणीमध्ये त्यांना सर्दीचे लक्षण आढळून आले होते. त्यामुळे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्दीच्या रुग्णांनाही कोरोना संशयित म्हणून उपचार करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार ८० वर्षीय वृद्धालाही जिल्हा रुग्णालयातील कोरोनासाठीच्या सिंहस्थ इमारतीतील कोरोना संशयित कक्षात दाखल करण्यात आले होते. दरम्यान ते रविवारी लघुशंकेसाठी मध्यरात्री बाथरूममध्ये गेले, मात्र त्यावेळी ते पाय घसरून पडले. त्यामुळे मार लागून ते जागीच बेशुद्ध पडले. त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. या ८० वर्षीय वृद्धाचे नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेकडे पूर्वीच पाठवण्यात आले असून, अहवाल प्रलंबित आहे.