कळवण तालुक्यात कोरोना करतोय युवकांना लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:10 AM2021-03-30T04:10:58+5:302021-03-30T04:10:58+5:30
कळवण शहर व तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, कळवण नगरपंचायतच्या यंत्रणेने कोरोना बाधितांना व घराला बंदिस्त करण्यासाठी ...
कळवण शहर व तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, कळवण नगरपंचायतच्या यंत्रणेने कोरोना बाधितांना व घराला बंदिस्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात केली आहे.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ.सचिन पटेल यांनी शहरात नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्यास कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याची सूचना यंत्रणेला केली आहे.
आतापर्यंत १५ ते ४० या वयोगटांतील २५० हून अधिक युवकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे युवकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या वयोगटांतील नागरिकांमध्ये लक्षण विरहित रुग्णांचे प्रमाण हे जास्त आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असले, तरीही यांच्यामुळे इतरांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षण विरहित आणि सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेले रुग्ण जास्त आहेत, परंतु अशा रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे येत दिसून आहे. गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका आहे. युवक, नागरिक कामानिमित्त सर्वाधिक वेळ बाहेर असतात. त्यामुळे या वयोगटांतील नागरिकांना सर्वाधिक लागण होत आहे . यांच्या माध्यमातून यांच्या परिवारातील व्यक्तींना लागण होत आहे.
अनेक युवक मास्क घालत नसल्याचे चित्र कळवण शहरातील व तालुक्यातील रस्त्यांवर दिसून येत आहे. युवकांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना मृत्यूचा धोका कमी असतो. कोरोनामुळे मृत्यू होणाचे प्रमाण हे ५० वर्षांपुढील रुग्णांचे जास्त आहे. कळवण तालुक्यात आतापर्यंत १६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनाच जीव गमवावा लागला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोनाची लक्षणे दिल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यावी. कोरोना काळात त्रिसूत्री नियमांचे पालन करावे. यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होईल, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर पाटील यांनी केले आहे.