बाजार समितीत प्रवेशासाठी कोरोना चाचणी दाखला आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:15 AM2021-05-21T04:15:26+5:302021-05-21T04:15:26+5:30
सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून (दि. २४) सुरू होत असून, समितीच्या मुख्य बाजार आवारासह नांदुरशिंगोटे, दोडी ...
सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून (दि. २४) सुरू होत असून, समितीच्या मुख्य बाजार आवारासह नांदुरशिंगोटे, दोडी बु., पांढुर्ली, नायगाव, वडांगळी व वावी उपबाजार आवारात आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. निगेटिव्ह दाखला व टोकन असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती सभापती लक्ष्मणराव शेळके, सचिव विजय विखे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बाजार समितीचे कामकाज बंद होते. मात्र, सोमवारपासून बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारासह उपबाजार आवारांतील कामकाज सुरू होत असून, कोरोना विषाणू (कोविड - १९) या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिन्नर मुख्य बाजार आवारात कांदा मालाचे लिलाव दर सोमवार, मंगळावार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी तसेच नांदुरशिंगोटे उपबाजार येथे दर सोमवार व शुक्रवारी, दोडी बु. उपबाजार येथे दर बुधवार, नायगांव उपबाजार येथे दर सोमवार ते शुक्रवार व वडांगळी उपबाजार येथे दर सोमवार ते शुक्रवार याप्रमाणे शेतमालाचे लिलाव होतील. परंतु बाजार आवारात पिकअप ५० व ट्रॅक्टर १०० अशा एकूण १५० वाहनांचेच दिलेल्या टोकनप्रमाणे लिलाव होणार असल्याने कांदा शेतमाल विक्रीस आणताना अगोदरचे दिवशी शेतकर्यांनी प्रथम कोरोनाची आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. चाचणी करून घेणे आवश्यक आहे व नंतर टोकन घेऊनच कांदा शेतमाला विक्रीसाठी आणावयाचा आहे.
------------------
शेतकऱ्यांना टोकन
बाजार आवारात येताना केवळ दोन व्यक्तीच (वाहनचालक व शेतकरी) यांनी आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. कोरोना चाचणी निगेटिव्ह असा शेरा असल्याचा दाखला बाजार आवाराच्या गेटवर दाखविल्यानंतरच प्रवेश दिला जाईल तसेच बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना टोकन नंबर दिले जातील. त्याप्रमाणे संबंधीत शेतकर्यांनी दिलेल्या तारखेस टोकनप्रमाणे आपले वाहन बाजार आवारात कांदा माल विक्रीसाठी घेऊन यावे. दिनांकाप्रमाणे नाव नोंदणी केल्याशिवाय व टोकन नंबर सोबत असल्याशिवाय बाजार आवारात प्रवेश दिला जाणार नाही. लिलाव सुरू झाल्यानंतर फक्त माल विक्रेता शेतकरीच वाहनाजवळ थांबेल.
-----------
नियमांचे पालन करावे
बाजार आवारात अनावश्यक गर्दी करू नये व सोशल डिस्टन्सिंग पाळावे. वाहन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याने आपले नाक, तोंड, कान यावर शेतमाल विक्री करून घरी परतत नाही तोपर्यंत मास्क, रुमाल बांधणे आवश्यक राहील. लिलाव झाल्यानंतर क्रमवारीप्रमाणेच गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून आपले वाहन लाईनमध्ये काट्यावर घेऊन जायचे आहे, अशा सूचना संचालक मंडळाने केल्या आहेत.